कल्याण: कल्याण डोंबिवली शहरात गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या पत्री पुलाचे काम मार्गी लागले असले तरी डोंबिवलीतील कोपर पुलाचे काम धीम्या गतीने सुरू आहे. तसेच ठाकुर्ली उड्डाणपूलाचे काही काम बाकी आहे. यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान पुलांची काम धीम्या गतीने सुरू असल्याने मनसेने 1 एप्रिलचे औचित्य साधून अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केलाय. ठाकुर्ली उड्डाणपूल परिसरात मसनेने एप्रिल फुल, डब्बा गुल, कधी होणार डोंबिवलीतले पूल ? अशा घोषणा देत केक कापत पालिका प्रशासन आणि सत्ताधा-यांवर निशाना साधला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून कल्याण डोंबिवलीतील पुलांची कामे रखडली आहेत. तारीख पे तारीख असाच काहीसा सिलसिला सुरू असून नागरिकांना वारंवार एप्रिल फुल केले जात आहे. त्यामुळेच आज 1 एप्रिल रोजी, राज्य शासन , सत्ताधारी, आणि केडीएमसी प्रशासनाचा आम्ही अशा प्रकारे निषेध केला आहे, असं मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी सांगितले.