कल्याण : कल्याणडोंबिवली महानगरपालिका हद्दीत शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता दुकानं सुरू ठेवण्यास पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाला कल्याण डोंबिवलीतील व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. शनिवारी या निर्णयाविरोधात व्यापा-यांनी आंदोलन व रास्ता रोको करत पालिका प्रशासनाला जाब विचारला. व्यापाऱ्यांच्या भूमिकेला आम्ही पाठिंबा दिला असून आम्ही नेहमी व्यापाऱ्यांसोबत आहोत असे कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
शनिवार आणि रविवार हे दोन्ही दिवस आमच्या व्यावसायासाठी महत्वाचे आहे. आधीच लॉकडाऊन मध्ये व्यवसाय तोट्यात सुरू असून केवळ दुकानांमधूनच कोरोना पसरतो का ? असा सवाल व्यापाऱ्यांनी उपस्थित केले आहेत. तर व्यापाऱ्यांच्या भूमिकेला मनसेने पाठिंबा दिला असून डी मार्ट व अन्य मोठेखानी मॉलला वेगळा नियम व किरकोळ व्यापा-यांबाबत वेगळी भूमिका घेतली जात असल्याचा आरोप देखील राजू पाटील यांनी केला आहे.
दरम्यान, व्यापा-यांनी भाजपाचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्याशी सुद्धा चर्चा केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यामुळे या आंदोलनात लोकप्रतिनिधींनी उडी घेतली असून जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याशी चर्चा करून यावर काही तोडगा काढतात का? ते पाहावे लागेल.