मुंबई - कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत गेल्या काही दिवसांपासून लसीकरण मोहीम थंडावली आहे. सुरुवातीला शहरात लसीकरण मोहिम वेगात सुरू होती. मात्र, ग्रामीण भागातील बहुसंख्य नागरिकांचा लसीकरणाचा पहिला डोसही झाला नाही. ही बाब लक्षात घेता येत्या शनिवारी, रविवारी आणि सोमवारी मनसेच्या वतीने कल्याण ग्रामीणमध्ये मोफत लसीकरणाचे आयोजन करण्यात आल्याचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी "लोकमत"शी बोलताना सांगितले आहे.
लसींचा तुटवडा असल्याने सध्या शहरातील नागरिकांना चातकासारखी लसिकरणाची वाट पाहावी लागतेय.ग्रामीण भागात लसीकरण केंद्रांचा अभाव असून पैसे देऊन लस घेणे सध्याच्या काळात नागरीकांसाठी कठीण आहे. त्यामुळे कल्याण ग्रामीण मधील प्रीमियर मैदान येथे येत्या शनिवारी, रविवारी आणि सोमवारी सकाळी 10 ते 5 या वेळेत मोफत लसीकरण केले जाणार आहे. सुरवातीच्या टप्प्यात 2 हजार लस आम्ही विकत घेऊन नागरिकांना मोफत देणार असल्याचे राजू पाटील म्हणाले. दुसऱ्या लाटेत शहरी भागासोबतच ग्रामीण भागात देखील कोरोनाने चांगलेच डोके वर काढले होते. त्यामुळे सुरवातीला लसीकरणं म्हटलं की नाकं मुरडणारी माणसं लस पाहिजे म्हणून आता गर्दी करू लागले आहेत.
असे होणार लसीकरण
शनिवारी ( 10 जुलै) - रिक्षाचालकांसाठी
रविवारी ( 11 जुलै) - गोरगरीब व ज्येष्ठ नागरिक
सोमवारी ( 12 जुलै) - नाभीक समाजासाठी
ऑफलाईन पद्धतीला प्राधान्य
ऑनलाईन पद्धतीने लसीकरण फार कमी होणार आहे. कारण यामध्ये शहराच्या बाहेरील देखील नागरिक येतात त्यामुळे कल्याण डोंबिवलीकरांना लसीकरणाला मुकावे लागते. त्यामुळे जास्तीत जास्त ऑफलाईन पद्धतीने लस दिली जाणार असून कल्याण डोंबिवलीतील नागरिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. येताना नागरिकांनी आपले आधार कार्ड सोबत ठेवावे असे डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत यांनी सांगितले आहे.