डोंबिवली : कोरोना काळात शाळा व्यवस्थापनाने पालकांवर फी भरण्यासाठी सक्ती करू नये, तसेच फीमध्ये सवलत द्यावी, असे आदेश शासनाने देऊनही डोंबिवलीतील होली एंजल्स शाळेने फीसाठी पालकांना वेठीस धरले आहे. त्यामुळे २०० पालकांनी मनसेचे कल्याण ग्रामीण अध्यक्ष व माजी नगरसेवक मनोज घरत यांच्याकडे न्याय मिळावा, यासाठी मदत मागितली. त्यानुसार या बैठकीत शाळा व्यवस्थापनाविरुद्ध जानेवारीत मनसेच्या पद्धतीने शाळेला हिसका दाखविण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.कोरोनामुळे नऊ महिन्यांपासून राज्यातील शाळा व कॉलेज बंद आहेत. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाने फीसंदर्भात विद्यार्थ्यांवर व पालकांवर दबाव आणू नये व फीमध्ये सवलत द्यावी, असे आदेश आहेत. मात्र, होली एंजल्स शाळेने पालकांना पूर्ण फी भरण्यासाठी तगादा लावला आहे. त्यामुळे पालकांनी घरत यांची भेट घेत तोडगा काढण्यास विनंती केली. त्यानुसार घरत यांनी शाळा व्यवस्थापनाला फीमध्ये सवलत द्यावी अशी विनंती केली. मात्र, शाळेने मागणी मान्य न केल्याने पालकांत संतापाची भावना आहे. शाळा व्यवस्थापनाने महिनाअखेर फीमध्ये सवलत देण्याचा ठोस निर्णय न घेतल्यास जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मनसेच्या पद्धतीने हिसका दाखवला जाईल, असा इशारा घरत यांनी दिला आहे.दरम्यान, या शाळेत सुमारे पाचशेच्या आसपास विद्यार्थी आहेत. सध्या शाळा शिक्षकांनाही कमी पगार देत आहे. ऑनलाइन पद्धतीने शाळा सुरू आहे. ऑनलाइन प्रक्रियेत शाळेला खर्च कमी येत असून शाळेची मनमानी सुरू आहे. आम्ही ही मनमानी खपवून घेणार नाही. पालकांना न्याय मिळेपर्यंत मनसे पालकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी असल्याचे घरत यांनी पालकांना सांगितले.
"फीमध्ये सवलत न दिल्यास २०० पालकांसह मनसे दाखवणार हिसका"
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 5:15 AM