लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : चालत्या लोकलमध्ये मोबाइल हिसकावणाऱ्या चोरट्याला पकडण्याच्या नादात प्रवासी लोकलखाली येण्यापासून थोडक्यात बचावल्याची घटना शुक्रवारी सकाळी आंबिवली स्थानकात घडली. दरम्यान, मोबाइल चोरून पलायन केलेल्या चोरट्याला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने अवघ्या २४ तासांत अटक केली.
नाशिकमध्ये राहणारे विनायक उन्हाळे मुंबई एअरपोर्ट येथे कामाला आहेत. ते रोज नाशिक ते मुंबई असा प्रवास करतात. गुरुवारी त्यांची रात्रपाळी होती. सकाळी त्यांनी नाशिक येथे जाण्यासाठी घाटकोपर येथून कसारा लोकल पकडली. सकाळी १० वाजून ५० मिनिटांच्या आसपास गाडी आंबिवली रेल्वे स्थानकात उभी असताना, एक तरुण गाडीत चढला आणि विनायक यांच्या हातातील महागडा मोबाइल हिसकावून त्याने पळ काढला. विनायक यांनी चोरट्याचा पाठलाग केला. इतक्यात गाडी सुरू झाली. ती गाडी पकडण्याच्या नादात विनायक गाडी आणि फलाट यामध्ये पडणार होते, ते थोडक्यात बचावले, अन्यथा चालत्या गाडीखाली सापडले असते.
२४ तासांत चोरट्यास अटक सीसीटीव्हीच्या मदतीने कल्याण लोहमार्ग पोलिसांनी त्या चोरट्याचा शोध सुरू केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मिक शादरुल आणि त्यांच्या पथकाने शोध घेतला. २४ तासांच्या आत चोरट्यास अटक करण्यात पथकाला यश आले. मारुती सकट असे चोरट्याचे नाव असून, त्याच्याकडून चोरीचा मोबाइल जप्त करण्यात आला आहे. त्याने अन्य किती गुन्हे केले आहेत, याचा तपास पोलीस करीत आहेत.