प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: येथील एमआयडीसी मिलापनगरमध्ये वंदेमातरम उदयान समोर रस्त्यावर आज सकाळी एक मुंगूस जखमी अवस्थेत बेशुध्द पडलेले आढळुन आले. स्थानिक रहिवाशांनी त्याला लागलीच प्राण्यांच्या डॉक्टरांकडे नेले. त्याच्यावर उपचार झाल्याने ते शुध्दीवर आले असून ते पुर्णपणे बरे झाल्यावर त्याला जंगलात सोडण्यात येणार आहे.
एखादया वाहनाची धडक बसल्याने मुंगूस जखमी झाल्याचे बोलले जात आहे. निवासी भागातील रहिवासी तथा प्राणीमित्र नंदकुमार यादव यांनी गंभीर अवस्थेतील मुंगूसाला लागलीच उचलून जवळच राहणारे प्रल्हाद सापरा व अरविंद टिकेकर यांच्या बंगल्यात नेऊन पाणी पाजले. पण मुंगुसाची गंभीर परिस्थिती पाहून मिलापनगर मध्ये राहणारे प्राण्याचे डॉक्टर मनोहर अकोले यांच्याकडे नेण्यात आले. डॉ अकोले यांनी त्या मुंगुसावर लगेच उपचार केल्याने ते शुद्धीवर आले आणि काही प्रमाणात चालू लागले. त्याला आता एक दिवस सापरा/टिकेकर यांच्या बंगल्याचा आवारात निगराणी खाली ठेवण्यात आले आहे.
उद्या पुन्हा डॉक्टर अकोले हे तपासणी करणार असून जर हे मुंगूस पूर्ण बरे झाले तर त्याला बाहेर अधिवासात सोडण्यात येणार आहे अशी माहिती स्थानिक रहिवाशी राजू नलावडे यांनी दिली. एमआयडीसी निवासी भागात मुंगूस, घोरपड, साप इत्यादी प्राणी बऱ्याचवेळा लोकांना दिसत असतात. निवासी भागातील रोडचे काँक्रीटीकरण होत असल्याने वाहनांचा वेग वाढला असून वाहन चालकांनी निवासी भागातील अंतर्गत रस्त्यावर वाहनांचा वेग कमी ठेवावा जेणेकरून रस्ते ओलांडताना मनुष्य आणि प्राणी यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन नलावडे यांनी केले आहे.