लॉकडाऊन काळात गरजू आणि गरीब नागरिकांना पोटभर जेवण मिळावे यासाठी शिवभोजन थाळीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यानुसार डोंबिवली शहरात देखील सेनेच्या मध्यवर्ती शाखेत 1 मे पासून शिवभोजन थाळीचा शुभारंभ करण्यात आला होता. 21 दिवसात जवळपास 11 हजाराहून अधिक नागरिकांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे. वाटप सुरू झाल्यापासून आतापर्यंत दररोज 500 हुन अधिक गरजू नागरिक थाळीचा लाभ घेत आहेत.
शिवभोजन थाळीमध्ये दररोज 2 चपाती, विविध प्रकारच्या भाज्या, वरण, भात, लोणचे इ. अन्नपदार्थांचा समावेश या थाळीमध्ये आहे. हे सर्व जेवण आई एकविरा आणि माऊली या दोन महिला बचत गटांना देण्यात आले असून यामुळे महिलांना सुद्धा रोजगाराची संधी मिळाली आहे. राज्यभरात लॉकडाऊनची परिस्थिती असल्यामुळे शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात नागरिकांना दिली जात आहे. चांगल्या गुणवत्तेचे जेवण मिळत असल्याने नागरिक स्वतः हुन शहरशाखेस भेट देऊन उपक्रमाचे कौतुक करत असल्याचे डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांनी सांगितले.