डोंबिवली: २०२४ मधील लोकसभा निवडणुकांचे लक्ष्य ठेवून ज्या ठिकाणी भाजपचे खासदार नाहीत अशा सर्व ठिकाणी केंद्रीय स्तरावरून वरिष्ठ नेते पाठवून तेथे पक्षाचे संघटन बळकट करण्यासाठी व्यूह रचना करण्यात आली असून त्या उद्देशाने कल्याण लोकसभेत देखील केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या तीन दिवसीय आढावा दौऱ्याला रविवारी सुरुवात झाली असून माझ्या कल्याण लोकसभा मतदार संघाला मात्र कोणताही धोका नाही, असे वक्तव्य खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केले. ठाकूर यांचा दौरा घोषित झाल्यापासून शिंदे यांच्या उमेदवारीला धोका, कल्याण लोकसभेवर भाजपचा दावा अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. त्या चर्चा आता थांबवा असेही शिंदे म्हणाले.
राज्यातील १६ लोकसभा मतदारसंघात भाजपचे वरिष्ठ नेते प्रवासाला जाणार असल्याचे नियोजन हे ६ महिने आधी ठरवण्यात आले होते, राज्यात तीन महिन्यांपूर्वी शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या युतीचे सरकार आले, त्यामुळे नियोजित दौरा त्यांनी केला. अशा सकारात्मक दृष्टीने त्या दौऱ्याकडे आम्ही बघत असून माध्यमांनी मसाला लावून वृत्त देणं थांबवा असे आवाहन शिंदे यांनी केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही आगामी काळात भाजप शिवसेना यांच्यात युती होऊन निवडणूका लढवल्या जातील असे स्पष्ट केले आहे, त्यामुळे कल्याण लोकसभेतून पुन्हा मलाच उमेदवारी मिळेल आणि युतीच्या माध्यमातून आम्ही सगळे कार्यरत राहू असे देखील शिंदे म्हणाले.
ठाकूर यांनी घेतला मोदकाचा आस्वाद मंत्री अनुराग ठाकूर हे डोंबिवलीत येताच त्यांचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्वागत केले, त्यापाठोपाठ खासदार शिंदे यांनीही त्यांचे स्वागत केले. स्वागत समारंभापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शिंदेंच्या निवासस्थानी ठाकूर, चव्हाण यांनी जाऊन चहापानाचा आस्वाद घेतला, त्यावेळी ठाकूर यांनी आवर्जून मोदक खाऊन गणपती बाप्पा मोरया म्हणत प्रसाद मिळाला असे सांगून आनंद व्यक्त केला.
कल्याणच्या जागेवर भाजपचा दावा नाही - ठाकूर कल्याण लोकसभेत आमचे मित्र खासदार शिंदे हे कार्यरत असून पक्ष संघटन बळकटी देण्याचे कार्य आम्ही करत आहोत, त्याचा एक भाग म्हणून हा दौरा आहे. या मतदार संघावर भाजपचा दावा असा कोणताही हेतू नाही, मोदक गोड होता, त्यात माध्यमांना वाटतं म्हणून मसाला लावून त्याची गोडी का घालवावी असे मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले.