कल्याण: गृहउद्योगासाठी मुद्रा कर्ज मिळवून देते असे आमिष दाखवून महिला बचत गटाच्या नावाने गंडा घातल्याच्या तक्रारींवरून शमीम बानो या महिलेला शिवसेना महिला आघाडी आणि फसवणूक झालेल्या महिलांनी चोप देत महात्मा फुले चौक पोलिसांच्या हवाली केले आहे. बानो ही काँग्रेसची माजी पदाधिकारी असून तीचा स्टॅम्प वेंडरचा व्यवसाय आहे. या कामाच्या निमित्ताने अनेक महिला तिच्या संपर्कात आल्या असता तिने मुद्रा कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून पैसे उकळले आहेत अशा तक्रारी महिलांच्या आहेत.
कर्ज मिळाले नाही त्याचबरोबर गुंतवलेले पैसे मिळाले नसल्याने फसवणूक झालेल्या महिलांनी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी आशा रसाळ यांच्याशी संपर्क साधला. मंगळवारी संध्याकाळी फसवणूक झालेल्या महिला आणि शिवसेना महिला आघाडी कार्यकत्र्या बानोला जाब विचारण्यासाठी पोहचल्या असता. तीने उलट सुलट उत्तरे देण्यास सुरु वात केली. यावेळी संतप्त महिलांनी बानोला चोप दिला आणि तिला पकडून महात्मा फुले पोलिसांच्या हवाली केले. फसवणूक झालेल्यांना पैसे लवकर मिळाले पाहिजेत त्यासाठी तिच्यावर ठोस कारवाई करावी अशी मागणी संबंधित महिलांनी केली. कारवाईचे आश्वासन महिलांना पोलीसांकडून देण्यात आले.