कल्याण- शहराच्या पूर्व भागातील चक्कीनाका परिसरात अमेय मल्टी स्पेशालिटी या १०० बेडच्या रुग्णालयाचे लोकार्पण कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी करण्यात आले.
या प्रसंगी माजी आमदार जगन्नाथ शिंदे, कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड, शिवसेना शहर प्रमुखमहेश गायकवाड, माजी नगरसेवक निलेश शिंदे, मल्लेश शेट्टी, कैलास शिंदे, प्रशांत काळे आदी मान्यवर उपस्थित होते. माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या कुटुंबियांनी नेहमीच सामाजिक बांधलकी जपली आहे. त्यांचे आरोग्य सेवेतील सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे. शहरातील आरोग्याच्या सुविधेची गरज ओळखून त्यांनी अमेय मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाची उभारणी केली आहे असे गौरवोद्गार खासदार शिंदे यांनी प्रसंगी काढले.
आमदार गायकवाड यांनीही माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच खासदारांच्या उपस्थितीत कल्याण पूर्वेतील समस्यांचा पाढा वाचला. आरक्षीत भूखंडावर बेकायदा बांधकामे झाली आहे. अनेक आरक्षित भूखंड वाचविण्याचे काम आमदार या नात्याने मी केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निर्णय घ्यायला वेळ लावत नाहीत. यू टाईप रस्त्याचेही काम लवकरात लवकर व्हावे अशी आपेक्षा व्यक्त केली.
अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराचा २ वर्षात कायापालट होणार
काशी विश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराच्या विकासाकरीता १५० कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. .प्राचीन शिवमंदिर ही मध्यवर्ती संकल्पना निश्चित करून परिसरामध्ये या प्राचीन शिल्पाच्या धर्तीवर कामे केली जाणार आहेत. सुशोभिकरणाचे संपूर्ण काम काळया पाषाणात केले जाणार यात प्रवेशद्वार, प्रवेशद्वारासमोरील चौकात नंदी, वाहनतळ, प्रदर्शन केंद्र, अँम्पी थिएटर, संरक्षक भिंत, मुख्य रस्ता व अंतर्गत रस्ते, क्रिडांगण आणि स्वच्छतागृह, बंधारा, भक्त निवास, घाट आणि संरक्षक भिंत आदी कामांचा समावेश आहे. या कामाला लवकर सुरूवात होणार आहे. येत्या २ वर्षात या प्राचीन शिवमंदिरातील कायापालट होणार असल्याची माहिती खासदार शिंदे यांनी दिली आहे.