मुरलीधर भवार-कल्याण: कल्याण-मुंबई गोवा महामार्गाची जबाबदारी मागच्या वर्षी ज्यांनी घेतली. त्यांनी जबाबदारी व्यवस्थित पार पाडली नाही. आत्ता तात्पुरती दुरुस्तीची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. मी गणेशाकडे प्रार्थना करतो की, मुंबई गोवा महामार्गाचे काम डॉ. श्रीकांत शिंदे सारख्या हुशार राजकारण्यास दिले तर तो रस्ता लवकर होईल असे वक्तव्य शिंदे सेनेच्या युवा सेनेचे सचिव दीपेश म्हात्रे यांनी केले आहे. त्यांनी हे वक्तव्य करुन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना पुन्हा एकदा मुंबई गोवा महामार्गाच्या कामावरुन डिवचले आहे.
गेल्याच महिन्यात शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार शिंदे यांची डोंबिवली शहर शाखेत भेट घेऊन मुंबई गोवा महामार्गाची जबाबदारी त्यांनी हाती घ्यावी अशी मागणी केली होती. त्या संदर्भातील एक पत्र वजा निवेदन पदाधिकाऱ्यांनीकेंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले होेत. त्या पाठोपाठ शिंदे सेनेचे नेते रामदास कदम यांनीही सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांच्यावर मुंबई गोवा महामार्गाच्या कामावरुन तोंड सुख घेत टिकेचे लक्ष्य केले होते. त्यांना मंत्री चव्हाण यांनी सडेतोड उत्तर देऊन त्यांची बोलती बंद केली होती. त्या पाठोपाठ आत्ता शिंदे सेनेचे युवा सेना सचिव म्हात्रे यांनी पुन्हा मंत्री चव्हाण यांना डिवचले आहे. यावर भाजपमधून काय प्रतिक्रिया दिली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
कोकणात जाण्याकरीता डोंबिवली येथून चाकरमान्याकंरीता ९६ बसेस आज सोडण्यात आल्या. या बसेसची व्यवस्ता खासदार शिंदे यांनी केली होती. या प्रसंगी युवा सेना सचिव म्हात्रे यांनी उपरोक्त वक्तव्य केले. या कार्यक्रमास माजी नगरसेवक विश्वनाथ राणे देखील उपस्थित होते.