डोंबिवली - वेळापत्रक सुधारत नसल्याने आधीच मध्य रेल्वेची वाहतूक विलंबाने होत असतानाच मंगळवारी ठाकुर्ली कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याची घटना संध्याकाळी ७.१५ वाजता घडली. त्या घटनेमुळे धीम्या मार्गावरील वाहतूक विलंबाने सुरू होती, काही लोकल डोंबिवली, कल्याण मार्गावर एकापाठोपाठ उभ्या होत्या. त्यामुळे घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले.
नेमका बिघाड काय झाला होता याबाबत डोंबिवली लोहमार्ग पोलीस काही माहिती देऊ शकले नाहीत. परंतू ठाकुर्ली कल्याण मार्गावर सिग्नल नसल्याने डाऊन धीम्या मार्गावर लोकल उभ्या असून त्या गर्दीने खच्चून भरल्या होत्या. कोणी ओव्हरहेड वायरची समस्या असल्याचे म्हणाले तर कोणी सिग्नल फेल असल्याचे म्हंटले. रेल्वेकडून त्यास दुजोरा मिळाला नाही. त्या घटनेमुळे रात्री उशिरापर्यंतची लोकल वाहतुकीचे वेळापत्रक कोलमडल्याने त्याचा त्रास चाकरमान्यांना झाला.
दरम्यान, आज संध्याकाळी ७.३०च्या सुमारास ठाकुर्ली ते कल्याण रेल्वे स्टेशन दरम्यान ओ एच इ वायर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने डाऊन स्लो रेल्वे लाईन वरील सर्व लोकल बंद आहेत.दुरूस्ती चे काम सुरू असून योग्य तो पोलिस बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे, अशी माहिती डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांनी दिली.