डोंबिवली - शहराच्या पूर्व पश्चिम भागाला जोडला जाणारा कोपर उड्डाणपुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात सुरू आहे. या महिन्याच्या तिसऱ्या आठवडयात उड्डाणपुलाचा स्लॅब भरण्यात येईल, त्यानंतर २८ दिवसानंतर तांत्रिक मापदंडानुसार तो पूल वाहतूकीसाठी सुरू करता येईल. त्या दरम्यान उर्वरित कामे करण्यात येतील, त्यात विद्युतीकरण व सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातील इतर कामे केले जातील असे महापालिकेने शुक्रवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले. (Municipal Corporation announces new deadline for Kopar flyover, will the bridge be operational by the end of August?)
वरील सर्व बाबींचा विचार करता तो पूल ऑगस्ट अखेर सुरू होणे अपेक्षित असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली यांनी दिली आहे. त्या ठिकाणी सद्या सुरू असलेल्या कामाबाबत त्यांनी सांगितले की, पावसाळ्याच्या कालावधीत स्लॅब भरताना अधिक सुरक्षा व खबरदारी घेण्याच्या दृष्टकोनातून नियोजन करण्यात आले आहे. परंतू पावसाळी वातावरणात पोहोच रस्त्यावर केलेल्या भरावावर डांबरीकरण करणे तांत्रिकदृष्टया योग्य नाही. तो प्रकल्प कोविड कालावधीत सुरू असल्याने याकरीता लागणारे बांधकाम साहित्य त्यात प्रामुख्याने लोखंड, ऑक्सीजन तसेच वाहतूक व्यवस्था व मनुष्यबळ यांची उपलब्धता मुबलक प्रमाणात नव्हती. त्यामुळे प्रकल्प अपेक्षित कालावधीत पूर्ण करण्यात बाधा आल्याचे महापालिकेने जाहीर केले.
अजूनही रेल्वेच्या अखत्यारीत असलेल्या भागातील महावितरणच्या दोन उच्चदाब विद्युत वाहिन्या मध्य रेल्वेने इतर ठिकाणी स्थलांतरीत केल्या नाहीत. महापालिकेद्वारे वेळोवेळी वरिष्ठ पातळीवर ही बाब मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना बैठकीमध्ये सुचित केली आली असून त्यावर मध्य रेल्वेमार्फत कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले. पोहोच रस्त्यामधे असलेले गर्डर उभारण्याचे काम ३ मे रोजी पूर्ण करण्यात आले. तो प्रकल्प अतिकुशल व महत्वाचा प्रकल्प असल्यामुळे कामादरम्यान वेळोवेळी चाचणी करण्यात येत आहे. त्यानुसार गर्डरचा स्लॅब भरण्यापूर्वी गर्डरमध्ये बसविण्यात आलेल्या एकूण ८७५८ नट बोल्टची तपासणी महापालिका अधिकारी व त्रयस्थ तांत्रिक लेखा परिक्षक यांच्याकडून करण्यात आली आहे. त्या पोहोच रस्त्यावरील स्लॅब बांधण्याचे काम पूर्ण झालेले असून त्याची तपासणी महापालिका अधिकारी व त्रयस्थ तांत्रिक लेखा परिक्षक करत असल्याचेही सांगण्यात आले.