कल्याण : केडीएमसीच्या आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी होणार असून, भाजप आणि मनसेला शह देण्यासाठी आम्ही चांगली एकता तयार करू, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्ष व माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांनी दिली आहे.
केडीएमसीच्या २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दाेनच नगरसेवक निवडून आले हाेते. त्यामुळे पक्षात मरगळ आली हाेती. परंतु, कल्याण-डाेंबिवलीतील पक्षाला तारण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपविली. शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी गुरुवारी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्या घरी मोठ्या संख्येने जमा झाले. यावेळी शिंदे म्हणाले की, सर्वांना विश्वासात घेऊन सर्व पद्धतीने पक्षाची बांधणी करायची आहे. मनपा हद्दीतील रखडलेल्या विकासकामांना चालना देण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यात स्वच्छता, रस्ते, पाणी, आरोग्य या बाबींवर मी जास्त लक्ष देणार आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्यास पक्षाचे कार्यकर्ते नागरिकांना मदत करतील.
ते पुढे म्हणाले, राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार असून, केडीएमसीची निवडणूकही महाविकास आघाडी लढविणार आहे. त्यात राष्ट्रवादीचे किमान १४ नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. निवडणुकीसाठी भाजप व मनसेने दंड थोपटले आहेत. त्यादृष्टीने महाविकास आघाडीही त्यांना शह देण्याचा प्रयत्न करणार आहे.