कल्याण- "माझ्यावर हल्ला करणाऱ्यासोबत त्याचे कुटुंबीय नव्हते, तर दुसरे लोक होते. आरोपीने माझी दिशाभूल केली होती. त्यामुळे त्याच्याविरोधात आता दुसरा जबाब महात्मा फुले पोलिस ठाण्यात नोंदविला आहे. त्यानुसार पोलिसांनी दुसरी तक्रार दाखल केली आहे," अशी माहिती माजी कुलगुरु अशोक प्रधान यांनी दिली आहे.
प्रधान यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्लाप्रकरणी उलट सुलट चर्चा सुरु असल्याने त्यांनी आज त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. या प्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख रवी पाटील आणि माजी नगरसेवक गणेश जाधव आणि छत्रपती शिक्षण संस्थेचे सचिव निलेश रेवगडे आदी उपस्थित हेाते.
माजी कुलगुरु प्रधान यांनी सांगिले की, १९ नोव्हेंबर रोजी त्यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला, तो त्यांच्या संस्थेतील निलंबित शिक्षकाकडून झाला होता. त्याने हल्ला केला त्यावेळी त्याच्यासोबत जे लोक होते. ते त्याचे कुटुंबीय असल्याचे सांगितले. त्यावेळी त्याच्याविषयी मला थोडी सहानुभूती होती. त्यामुळे पोलिस ठाण्यात पहिला जबाब नोंदविला तेव्हा त्याने केवळ मारहाण केल्याचे म्हटले होते. मात्र नंतर जेव्हा मला कळाले की त्याच्यासोबत असलेले लोक हे त्यांचे कुटुंबीय नव्हते. त्यामुळे त्याच्याविषयीची सहानुभूती गमाविली. त्यामुळे दुसरा जबाब पोलिस ठाण्यात नोंदवला आहे. त्यात घडल्या प्रकरणाची सर्व हकीकत नमूद करण्यात आली आहे. पोलिस या प्रकरणाचा योग्य प्रकारे तपास करीत आहेत. ज्याने हल्ला केला त्या व्यक्तीच्या विरोधात प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्याविषयी जास्त काही भाष्य करता येत नसल्याचे प्रधान यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, छत्रपती शिक्षण मंडळ या संस्थेवर मी कार्यरत होतो. २०१६ साली मी संस्थेतून निवृत्त झालो आहे. त्यानंतर संबंधित व्यक्तीच्या विरोधात कारवाई झाली आहे. त्या कारवाईशी माझा काही एक संबंध नाही असे प्रधान यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी संस्थेचे सचिव रेवगडे यांनीही हे संबंधित व्यक्तीच्या विरोधातील प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्याविषयी अधिकचे काही बोलणे टाळले. मात्र संबंधित व्यक्तीच्या वर्तणुकीसंदर्भात त्याच्याविरोधात कारवाई केल्याचे सांगितले.