कल्याण - माझा स्टाईक रेट शंभर टक्के आहे. पुढील वर्षाच्या ग्लोबल खांदेश महोत्सवाच्या आतच खांदेश भवनाची पायाभरणी केली जाईल असे आश्वासन कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी येथे केले.
कल्याण पश्चिमेतील फडके मैदानात उत्तर महाराष्ट्र खांदेश विकास मंडळातर्फे आयोजित ग्लोबल खांदेश महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवास खासदार शिंदे यांनी भेट दिली. या प्रसंगी त्यांनी उपोक्त आश्वासन दिले. यावेळी त्यांनी खान्देशी बांधवांशी संवाद साधला. गेल्या अनेक वर्षांपासून नित्यनेमाने हा महोत्सव साजरा करण्यात येत आहे. यामुळें केवळ कल्याण लोकसभा मतदारसंघातील नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील खांदेशी बांधवांच्या हक्काचा हा उत्सव झाला असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. महोत्सवात खान्देशातील कळण्याच्या भाकरी वांग्याचे भरीत, धपाटा , लाल मिरचीचा ठेचा, हिरव्या मिरचीचा ठेचा, मासवडी रस्सा, खापरावराचे मांडे, पापड, कुरडया, सांडगे, शेवया अश्या खान्देशी खाद्यपदार्थांची रेलचेल होती. खांदेशी खाद्यपदार्थांवर खासदारांनी ताव मारला.
केंद्रीय पंचायत राज मंत्री कपील पाटील, पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आमदार संजय केळकर, निरंजनडावखरे, राष्ट्रवादीचे बाळ्या मामा, जिजाऊ संस्थेचे निलेश सांबरे, सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे, श्री निलेश सांबरे, शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील, राजेश मोरे, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते रामेश्वर नाईक, विश्वास पाटील यांना खान्देशभूषण पुरस्कार, उन्मेश वाघ, योगेश पाटील, जयंत पाटील यांना खान्देश्री पुरस्कार, संजय बोरगावकर यांना खान्देश उद्योगभूषण पुरस्कार, कला क्षेत्रातील खान्देश्री पुरस्काराने सचिन कुमावत आणि पुष्पा ठाकूर यांना सन्मानित करण्यात आले.