डोंबिवली: कवी देहाने आपल्यात नसतात, पण त्यांनी लिहिलेल्या कविता, त्यातील शब्द, भावभावना हे आपल्यासोबतच पिढ्यानपिढ्या जिवंत असतात, त्यामुळे ना धों महानोर जरी आपल्यात नसले तरी त्यांच्या कवितांमधून ते आपल्यात सदैव जिवंत राहणार यात संदेह नसावा असे मत ज्येष्ठ कवी प्रा. अशोक बागवे यांनी व्यक्त केले. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनर्स आणि रोटरी क्लब ऑफ सन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने रानकवी ना. धों. महानोर यांना शनिवारी शुभम बँकवेट हॉल,मानपाडा रोड, डोंबिवली पूर्व येथे काव्यमय श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यावेळी मुख्य अतिथी कवी अशोक बागवे यांनी महानोरांच्या अनेक कवितांचा, त्यातील निसर्गाचा, त्यांच्या काव्य प्रकाराचा विश्लेषणात्मक उहापोह केला.
खांदेशी साहित्य व कवीच्या कवितेत उमटणारा निसर्ग त्यांनी उपस्थितांसमोर उलगडला. एखाद्या कलकाराला अशा प्रकारे श्रद्धांजली अर्पण करण्याचा रोटरीच्या इतिहासातील हा पहिलाच कार्यक्रम होता असेही सांगण्यात आले. कलेचे भव्यविश्व उभारणारे नितीन देसाई, विचारवंत हरि नरके व महानोरांना सर्वांनी कार्यक्रमाच्या शुभारंभाला श्रद्धांजली अर्पण केली. त्यावेळी बोलताना डोंबिवली विनर्सचे अध्यक्ष विद्याधर कुलकर्णी यांनी या सर्वांच्या कार्याची महती सांगितली. कार्यक्रमास रामचंद्र साळूंके , श्रीकांत म्हात्रे व कोमसाप भांडुपचे अध्यक्ष प्रकाश गोठणकर यांनी महानोरांच्या कविता सादर केल्या संपूर्ण कार्यकामाचे सुत्रसंचालन लेखक व रोटे. मनीष पाटील यांनी महानोरांविषयी आगळी वेगळी माहिती व अनुभव, कवितांची कडवी पेरत ओघवत्या शैलीत केलं आणि त्यांची 'डोळे' ही अतिशय तरल कविता सादर केली.
कवी सतीश सोळांकुरकर यांनी ही यावेळी महानोरांच्या मानवी धारणा मांडणाऱ्या काही कविता व अनुभव मांडले. कार्यक्रमाचे अतिथी कवी नारायण लाळे यांनी महानोर, त्यांच्या कविता आणि त्यांचा निसर्ग याचे सुंदर विवेचन केले महानोर निसर्गाशी इतके तद्रुप होते की त्याचं रक्त सुध्दा हिरवं असावं अशी उपस्थितांच्या काळजाला हात घालणारी मांडणी त्यांनी केली. त्यावेळी शहरातील अनेक मान्यवर रसिक आणि दोन्ही रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित होते. महानोरांच्या श्रद्धांजली कार्यक्रमाला त्यांच्या कवितेवर प्रेम करणाऱ्यांची उपस्थिती उल्लेखनीय होती असे उपस्थित साहित्यिक म्हणाले. सन सिटीचे अध्यक्ष अलंकार तायशेट्ये यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.