डोंबिवली : मतदार याद्यांमधून नावे गहाळ झाल्याबद्दल नागरिकांनी निवडणूक आयोगावर तीव्र संताप व्यक्त केल्याची दखल घेऊन डोंबिवलीतील दक्ष नागरिक एकत्र येऊन २ जूनपूर्वी न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. त्यासाठी सोमवारपासून दोन हजार मतदारांनी प्रतिसाद दिला असून, डोंबिवली परिसरातील सुमारे सतराशे नागरिकांनी सहभागी होणार असल्याचे कळवल्याची माहिती याचिका करण्यासाठी पुढाकार घेतलेले अक्षय फाटक यांनी दिली.
आयोगावर आक्षेप असून, आयोगाने नेमकी काय पद्धत अवलंबली हे स्पष्ट करावे, तसेच संबंधित मतदाराला कळवले होते का? जर फोटो नसेल तर त्याबाबत काय कार्यवाही केली होती? बँक केवायसी करत असेल तर तसे लेखी कळवते, ग्राहकाला वेळ देते, तसे आयोगाने संबंधित मतदारांना कळवले होते का? थेट नाव गहाळ होणे, करणे, हा लोकशाहीचा सर्वांत मोठा उत्सव म्हणवल्या जाणाऱ्या नागरिकांच्या मूलभूत हक्कावर गदा आणणारा, अन्यायकारक नाही का? या मुद्द्यांवर याचिका दाखल होईल, असे त्यांनी सांगितले. याबाबतची माहिती आयोगाने द्यावी, यासाठी माहिती अधिकाराचा वापर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच ती माहिती आयोगाने २ जूनपूर्वी द्यावी जेणेकरून ४ जूनच्या निवडणूक निकालापूर्वी याचिकेची सुनावणी होऊ शकेल, असे फाटक म्हणाले.