कल्याण- नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी शुक्रवारी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. नाशिक जागेवरुन महायुतीत प्रचंड रस्सीखेच सुरु आहे. या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यासाठी आज पुन्हा गोडसेंनी शिंदेंची कल्याणमध्ये भेट घेतली. खासदारांच्या भेटी मागचे कारण काय, असा प्रश्न गोडसे यांना विचारला असता त्यांनी सांगितेल की, महाविकास आघाडीचे उमेदवार जाहिर झाले. त्यांचा प्रचार सुरु झाल. आमचे शेवटच्या टप्प्यात मतदान होणार असले तरी महायुतीचे उमेदवार जाहिर झाल्यास महायुतीच्या उमेदवारांनाही पुरेसा प्रचार करणे सोपे होईल.
खासदार गोडसे यांनी सांगितले की, जागा कुठल्या पक्षाला सुटणार, हाच तिढा अद्याप सुटलेला नाही. आमच्या वरिष्ठांनी सांगितले की, त्यावर बऱ्यापैकी ताेडगा निघालेला आहे. कुठली जागा कुठल्या पक्षाला मिळणार, याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. आमचे हेच म्हणणे आहे की, लवकरात लवकर तोडगा निघावा.
जिल्हाध्यक्षही मुंबईत मुख्यमंत्र्याच्या भेटीला आलेले आहे, त्याबाबत काय सांगाल? अशी विचारणा गोडसे यांना केली असता त्यांनी सांगितले की, ही जागा शिवसेनेला सुटते की, अन्य कुठल्या पक्षाला, हे अधिकृतरित्या जाहीर झालेले नाही. त्यानंतर जो काही निर्णय आमच्या पक्षाचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील, तो मान्य असेल.
नाशिकची जागा ही पारंपारिकरित्या शिवसेने लढविली आहे. २०१४ सालच्या लोकसभा निवडणूकीत १ लाख ८७ हजार मतांचे मताधिक्य होते. २०१९ सालच्या लोकसभा निडवणूकीत २ लाख ९३ हजार मतांचे मताधिक्य होते. त्यामुळे ही जागा शिवसेनेला मिळावी, जसा आमचा आग्रह आहे, तोच आग्रह मुख्यमंत्र्यांचाही आहे, असे गोडसे म्हणाले.