कल्याण: येथील रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणतर्फे रोटरी साक्षरता मिशन अंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागातील १५ शिक्षकांना नेशन बिल्डर पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले. बालक मंदिर संस्थेच्या सभागृहात पार पडलेल्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून डिस्ट्रिक्ट लिटरसी कमिटी चेअर रो. डॉ. माधव बैतुले, तसेच अतिथी म्हणून अवेन्यू चेअर रो. राधिका गुप्ते यांची उपस्थित लाभली होती.
शिक्षणाचे सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना हा सन्मान दिला जातो. रोटरी इंडिया साक्षरता मिशनच्या विशिष्ट निवड पद्धतीने जिल्हा परिषदेच्या व कल्याण ग्रामीण भागातील सरकारी अनुदानित विविध १५ शाळांमधील सुमारे ७५ शिक्षकांचे प्रत्येक शाळेतील दहा विद्यार्थी आणि मुख्याध्यापक यांच्यामार्फत मूल्यांकन करून विविध शाळांच्या १५ शिक्षकांचा नेशन बिल्डर ॲवार्डने सन्मान करण्यात आला.
यात जिल्हा परिषद शाळा म्हारळच्या लीना टेंभे, वरप येथील रेश्मा नलावडे, मामणोलीच्या आशा घिगे, मांजर्ली येथील अंजली सोनार , रायता येथील सीमा जाधव आणि कांबा येथील राजाराम वानखडे तसेच डोंबिवली टिळकनगर बाल विद्यामंदिराच्या वृषाली देवधर, जागृती विद्यालय दहागावचे राजेश मिरकुटे, माध्यमिक विद्यालय कुंदे - मामणोलीचे परमेश्वर खेडकर, कै. बापूराव आघारकर शाळेचे जितेंद्र सोनावणे, मराळेश्वर विद्यालयाचे जगन्नाथ मोरे, गुरुकृपा हायस्कूलचे रतन बागल, समर्थ विद्यालय वालधूनीच्या प्रमिला पवार, बालक मंदिर संस्थेच्या प्रतिभा मोरे आणि शारदा मंदिर प्राथमिक शाळेच्या वैशाली बरकडे या शिक्षकांचा समावेश आहे. यावेळी अतिथी रो. राधिका गुप्ते आणि रो. डॉ. माधव बैतुले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तत्पुर्वी क्लबचे अध्यक्ष रो. कैलास देशपांडे, सचिव रो. प्रियांका सुरतकर, लिटरसी डायरेक्टर रमेश मोरे आणि प्रकल्प प्रमुख नामदेव चौधरी यांनी त्यांचे व सर्व उपस्थितांचे स्वागत केले. देशपांडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तर रो. नमिता भिडे यांनी सूत्रसंचालन केले.