लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : पेट्रोल - डिझेल इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी युवक कल्याण जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांनी सोमवारी कल्याण - शीळ महामार्गावरील टाटा पॉवर लेन भागात काही वेळ रास्ता रोको करून केंद्र सरकारचा निषेध केला.
वर्षानुवर्षे इंधन दरवाढ सुरूच असून आता यंदाही जीडीपी खाली घसरत आहे, ते योग्य नसून काहीही झाले तरीही ही दरवाढ कमी व्हायलाच हवी, या मागणीवर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम आहे. यासंदर्भात गतवर्षीही आंदोलन केल्याचे पाटील म्हणाले.दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भातही त्यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, जो अन्नदाता आहे त्यांना सरकार दहशतवादी अशी उपमा देते, हे योग्य नाही, त्यांच्या मागण्यांचा विचार केला पाहिजे. कोणत्याही घटकांचा विचार न करता सरकार थेट निर्णय घेत आहे हे योग्य नाही. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेश बोरगावकर, सारिका गायकवाड, प्रशांत नगरकर, उज्ज्वला भोसले, योगेश माळी, समीर भोईर, भाऊ पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
रुग्णवाहिकेला दिली वाटnआंदोलनादरम्यान एक रुग्णवाहिका कल्याणहून डोंबिवलीच्या दिशेने आली होती, तिने सायरन वाजवून सतर्क केले असता आंदोलक सुमित सोनके यांनी कार्यकर्त्यांना बाजूला सारून तिला मार्ग करून दिला. nत्यानंतर तलाठी कार्यालयापर्यंत पदयात्रा काढून दुचाकी ढकलून नेण्यात आल्या, तिथे ‘मोदी सरकार हाय हाय, इंधन दरवाढ कमी झालीच पाहिजे’ अशा घोषणा देण्यात आल्या.