कल्याण - कल्याण-डोंबिवली शहरं आजही आपलं मराठमोळपण जपून आहेत. रसिकप्रेक्षकांचीही येथे कमी नाही. आजही आवर्जून नाटकं पाहणा-यांची मोठी संख्या या ठिकाणी आहे. इतकंच नाही तर बदलापूर, अंबरनाथ या शहारातूनही खास नाटक पाहण्यासाठी रसिक कल्याण डोंबिवलीत येतात. कोरोनामूळे नाट्यगृह बंद असल्याने मनोरंजनाला ब्रेक लागला होता. मात्र आता काही नियमांवलीसह नाट्यगृह सुरू करण्यास परवानगी देण्यात आल्यानं कल्याण डोंबिवलीतील दोन्ही नाट्यगृह प्रेक्षकांच मनोरंजन करायला सज्ज झाली आहेत. शनिवारी डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात अभिनेता प्रशांत दामले यांच्या एका लग्नाची पुढची गोष्ट या नाट्यप्रयोगानं होणार आहे. विशेष बाब म्हणजे राज्यात पहिल्या नाट्यप्रयोगाचा मान डोंबिवलीला मिळाला आहे.
डोंबिवलीकरांचा तिकीट बुकिंगला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याबाबत प्रशांत दामले यांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेयर केली आहे. कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरातही रविवारी गाव तसं चांगलं या नाटकाचा प्रयोग संपन्न होणार असून जंतुनाशक फवारणी, सोशल डिस्टन्सिंग व इतर तयारीला सुरुवात झाली आहे. नाट्यनिर्मात्यांनी या ठिकाणी जास्तीत जास्त प्रयोग लावावेत. कल्याण डोंबिवलीकर ते हाऊसफुल नक्की करतील.रसिकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहेत असं मत सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचे व्यवस्थापक दत्तात्रय लधवा यांनी सांगितलं आहे. कल्याणमधील अत्रे रंगमंदीरातील लसीकरण केंद्र बंद करण्यात आलं आहे. रविवारी मालवणी नाटकाने नाट्यगृह पुन्हा सुरू होत असल्याने खास शैलीत रविवारी प्रेक्षकांच स्वागत करण्यात येणार असल्याच व्यवस्थापक माणिक शिंदे यांनी सांगितलं. त्यामुळे कल्याण डोंबिवलीत अखेर तिसरी घंटा रसिकांच्या कानावर पडणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.