अनिकेत घमंडी, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: शिवसेनेच्या शिंदे गटाच्या विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य करत बारामतीतून भाजपच्या कमळ चिन्हावर लढण्याची तयारी दर्शवली आहे. त्यावरून बारामतीच्या विजयात बिब्बा घालाल, तर कल्याणमध्ये तुम्हाला तारे दाखवू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने दिला आहे.
राष्ट्रवादीचे नेते व माजी खासदार आनंद परांजपे हे कल्याण मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. २०१९ व २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अनुक्रमे राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे आणि बाबाजी पाटील यांनी दोन लाखांहून अधिक मते घेतली होती. या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसची स्वतःची मते महायुतीच्या उमेदवाराला मिळण्यासाठी पक्षाची मंडळी पुढे येत आहेत, भाजप जसे मेळावे घेत आहे, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्याही बैठका सुरू आहेत. परांजपे हे मध्यंतरी माजी आमदार पप्पू कलानी यांनाही भेटले होते. डोंबिवली, कल्याण ग्रामीण, मुंब्रा, कळवा, उल्हानसगर, अंबरनाथ येथे राष्ट्रवादीची ताकद आहे. दोन महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री पवार हे कल्याण दौऱ्यावर आले होते, त्यासही चांगला प्रतिसाद मिळाला होता, असा दावा परांजपे यांनी केला.
बैठका, गाठीभेटी घेऊन कार्यकर्ते, पदाधिकारी आदींची मते परांजपे यांनी जाणून घेतली. मात्र, विजय शिवतारे यांनी बारामतीत वेगळी भूमिका घेतल्यास कल्याणमधील कार्यकर्तेही वेगळी भूमिका घेतील, असे परांजपे यांनी स्पष्ट केले. शिवतारेंची भाषा, ते सतत देत असलेले आव्हान यामुळे कल्याणमधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अस्वस्थ असल्याचे ते म्हणाले.
संवेदनशील मतदारसंघ
२०१४ मध्ये परांजपे निवडणुकीला उभे असताना खासदार शरद पवार हे कल्याणला सभेला आले होते. त्यावेळी पवार यांनी संघावर टीका केल्याने परांजपे यांची काही मते फिरल्याची त्यावेळी चर्चा होती. कल्याण हा संवेदनशील मतदारसंघ आहे. येथील मतदारांना गृहीत धरू नये. वेळप्रसंगी राष्ट्रवादी आपली ताकद दाखवेल, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते देत आहेत.