डोंबिवली : मुलाला झालेल्या मारहाणप्रकरणी तीन दिवस उलटूनही ठोस कारवाई होत नसल्याने, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा कार्याध्यक्षा विनया पाटील यांना सोमवारी मानपाडा पोलीस ठाण्यातच रडू कोसळले. या प्रकाराने जागे आलेल्या पोलिसांनी तत्परतेने हालचाली करत आरोपींना अटक केली. राज्याचा गृहविभाग सांभाळणाऱ्या पक्ष पदाधिकाऱ्यासोबत असा प्रकार घडत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांचे काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.आजदे गावातील विश्वनाथ पाटील यांचा बबन पडवळ यांच्याशी वाद झाला. यानंतर पडवळ आणि त्यांचा मुलगा शुभम यांनी पाटील यांचा मुलगा प्रथम याला मारहाण केली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला, परंतु तीन दिवस उलटले, तरी ठोस कारवाई नाही. पाटील यांची पत्नी विनया राष्ट्रवादीच्या डोंबिवली महिला जिल्हा कार्याध्यक्ष आहेत. ठोस कारवाई होत नसल्याने त्या ठाण्यात पोहोचल्या. दारूच्या नशेत आरोपींनी मारहाण केली. पोलिसांनी त्यांची वैद्यकीय चाचणीही केली नाही. किरकोळ कलमे लावली, असा आरोप विनया यांनी केला. तब्बल दोन तास त्या पोलीस ठाण्यात रडत होत्या. कल्याण-डोंबिवली राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष डॉ. वंडार पाटील तिथे पोहोचले आणि त्यांनी पोलिसांना जाब विचारला. अखेर मानपाडा पोलिसानी दोन्ही आरोपींना अटक केली.
न्यायासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकारीस कोसळले रडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 12:24 AM