कल्याण - राज्यात मुसळधार पावसाचे आगमन झाले असून मुंबई-ठाणे जिल्ह्याला गेल्या 4 दिवसांत पावसाने झोडपले आहे. वाढत्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने ठाणे जिल्ह्यात एनडीआरएफच्या दोन तुकड्या दिल्या आहेत. त्यापैकी एक तुकडी कल्याण डोंबिवलीसाठी देण्यात आली. त्यानुसार, 22 जवानांची एनडीआरएफची तुकडी आज कल्याण डोंबिवलीत दाखल झाली आहे.
कल्याणमध्ये आलेल्या एनडीआरएफ तुकडीचे प्रमुख राजेश यावले यांनी आज महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. कल्याण डोंबिवलीतील भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेतला. या पथकाच्या निवासाची व्यवस्था महापालिकेच्या वतीने करण्यात आली. अतिवृष्टीच्या काळात दुर्गाडी परिसरात तसेच अंबिका नगर, शहाड या सखल परिसरात पाणी साचून लोकांची मोठया प्रमाणात गैरसोय होते, यासाठी आज या पथकाने महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी दिपक निकम यांच्या समवेत दुर्गाडी गणेश घाट परिसर, अंबिका नगर, शहाड या परिसराची पाहणी केली.