कल्याण : मनसे पदाधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे एका नवजात अर्भकाला जीवनदान मिळाल्याची घटना बुधवारी दुपारी कल्याण पूर्वेत घडली आहे.आमराई परिसरातील एका कचराकुंडीच्या ठिकाणी नवजात बालक असल्याची माहिती मनसेचे माजी नगरसेवक अनंता गायकवाड यांना मिळाली. पक्षाच्या पदाधिकारी योगिता गायकवाड व उपशहर अध्यक्ष योगेश गव्हाणे यांनी लागलीच तेथ धाव घेत बालकाला तेथून उचलले, तसेच याबाबतची माहिती कोळसेवाडी पोलिसांना देत त्याला घेऊन रुक्मिणीबाई रुग्णालय गाठले. मात्र, तेथे बालरोग तज्ज्ञ नसल्याने तेथील डॉक्टरांनी त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यास सांगितले. लागलीच या बालकाला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. बालकाची प्रकृती उत्तम असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. बालकाला कचराकुंडीत टाकणाऱ्या मातापित्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी गव्हाणे यांनी केली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत मातापित्यांच्या निर्दयी वागण्याच्या घटना वाढल्या आहेत. कल्याण पूर्वेतच एका निर्दयी बापाने आपल्या चिमुकल्या मुलाला गरम कालथ्याचे चटके दिले होते, तर एका मातेने दोन चिमुकल्या मुलांना खाडीच्या मध्यभागी सोडून ती बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे.
नवजात अर्भकाला मिळाले जीवदान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 2:28 AM