मुरलीधर भवार, कल्याण: रेल्वे स्टेशन परिसरात फेरीवाले अजिबात बसता कामा नये. महापालिका सहाय्यक आयुक्त आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करावी असे आदेश कल्याणडोंबिवली महापालिकेच्या आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड़ यांनी दिले आहेत. महापालिका हद्दीतील वाहतूक व्यवस्थेचे जाळे सक्षम करणे. वाहतूक कोंडी कमी करणे. सार्वजनिक गणेशोत्सव काळात सरकारी यंत्रणांनी समन्वय साधावा या संदर्भात महापालिका आयुक्त जाखड यांनी आज बैठक घेतली.
या बैठकीस ठाणे वाहतुक विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रल्हाद रोडे, उपायुक्त धैर्यशील जाधव, महापालिका शहर अभियंता अनिता परदेशी, कल्याण आरटीओ अदिकारी आशुतोष बारकुल, एमएमआरडीए चे प्रतिनिधी, एमएसआरडीसी, एसटी महामंडळचे प्रतिनिधी, रेल्वे स्टेशन व्यवस्थापक आदी उपस्थित होते.
वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी महापालिका क्षेत्रात अवैध रिक्षा स्टँड बाबत पुढच्या सप्ताहात सर्व्हे करुन नंतर कारवाई करण्यात यावी. शिळफाटा रस्त्यावरील वाहतुक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महापालिका अतिक्रमण विभागाने रस्त्यावरील अनधिकृत होर्डिग्ज, अतिक्रमणे त्वरीत काढण्याची कारवाई करावी. वाहतुकीस अडथळा ठरणारे पोल आणि ट्रान्सफॉर्मर शिफ्ट करण्याची कार्यवाही वीज वितरण कंपनीने करावी. महापालिका हद्दीत सर्व जड वाहनांच्या प्रवेशावर बंधन घालून, वाहतुक विभागाने नोटीफिकेशन काढून एका आठवड्यात त्यांची अंमलबजावणी करावी असे आयुक्तांनी म्हटले आहे.
रेल्वे स्थानक परिसरातील वाहतुक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने स्थानिक पोलीस विभाग, आरटीओ, शहर वाहतुक विभाग आणि महापालिका अधिकारी यांनी संयुक्त पथके तयार करुन सकाळी ६ ते ११ आणि सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत कारवाई करावी, त्याचप्रमाणे पार्किंगसाठी वाहतुक विभागाने पार्किंग स्पा’ट निश्चित करावेत. नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करावी. स्कायवॉक नियमित स्वरुपात स्वच्छ ठेवून सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत खुले ठेवावेत. त्याचप्रमाणे शिवाजी चौक ते मोहम्मद अली चौक या रस्त्यावर एक दिशा मार्गाची कटाक्षपणे अंमलबजावणी करावी. त्याठिकाणी नो एंट्री बोर्ड लावण्यात यावेत असे सूचित केले आहे.