डोंबिवली : कल्याण स्थानकातील यार्डाचे रिमॉडेलिंग करून उत्तर, दक्षिण भारतातून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या शेकडो गाड्या येथेच थांबवून कल्याण-मुंबई मार्गावर लोकल सेवा अधिक सक्षम करण्याचा प्रस्ताव रखडला आहे. रिमॉडेलिंगच्या कामाचा कालावधी संपुष्टात आला असून प्रत्यक्षात काहीही चित्र बदलले नाही. लांब पल्ल्याच्या गाड्या गर्दीच्या वेळेत मुंबई, दादर, एलटीटी परिसरात धावत असल्याने उपनगरीय लोकलचा वक्तशीरपणा खालावला असून वर्षानुवर्षे लोकल वेळापत्रकानुसार धावत नसल्याने चाकरमान्यांचा लटकत कंटाळवाणा प्रवास सुरूच राहणार आहे.
कल्याण, कसारा मार्गाचे दोनवरून चार ट्रॅक, कल्याण-कर्जत मार्गाचे तीन ट्रॅक करण्यासंदर्भात महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा सर्व्हे झाला असून भूसंपादन प्रक्रियेसह अन्य तांत्रिक कामे कासवगतीने सुरू आहेत. टिटवाळा-बदलापूर या नव्या भागात रेल्वेसेवा, कल्याण-मुरबाड रेल्वे संदर्भात घोषणाबाजी झाली, पण काम पुढे सरकलेले नाही. कल्याण-वाशी, कल्याण-पनवेल लोकल सुरू करण्याचा रेल्वेचा मानस आहे. त्यासाठी कळवा-ऐरोली एलिव्हेटेड लिंक ट्रॅकसाठी ४२८ कोटी मंजूर झाले होते. परंतु त्या दृष्टीने नियोजन झाले नसल्याचे निदर्शनास येत आहे. मानस मंदिर, गुरवली, चिखलोली, सावरोली, जांभूळ, दातिवली आदी मुख्य मार्गावरील प्रस्तावित स्थानकांपैकी चिखलोली स्थानकाचा प्रस्ताव मार्गी लागला असून त्याची पूर्तता २०२४ आधी होणार का, अशी चर्चा सुरू आहे.
अर्थसंकल्पात २०१४ व त्याआधीपासून ज्या घोषणा केल्या त्यांच्या पूर्ततेचे प्रकल्पनिहाय वेळापत्रक जाहीर करावे. तसेच आतापर्यंतच्या डेडलाइनमध्ये प्रकल्प पूर्ण न केलेल्या कंत्राटदारांवर काय कारवाई करणार ते जाहीर करावे. - मनोहर शेलार, संस्थापक अध्यक्ष, उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्था
आंदोलन केल्यावर सगळे काही मिळते हे दिवेकरांच्या लक्षात आहे. ते करण्याची कोणाची इच्छा नाही, पण जर सरळ मार्गाने काही समस्या सुटत नसेल तर मग आंदोलन करण्याशिवाय प्रवाशांना पर्याय नसतो. प्रकल्प वेळेतच व्हायला हवे. - अॅड. आदेश भगत, अध्यक्ष दिवा रेल्वे प्रवासी संस्था
जे प्रकल्प आहेत ते वेळेत पूर्ण करता आले नाहीत. ते केले असते तर नव्या मागण्या पुढे आल्या नसत्या. जे प्रकल्प अर्धवट आहेत ते तातडीने पूर्ण करावे. - जितेंद्र विशे, उपाध्यक्ष, उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्था
लॉकडाऊनपासून आतापर्यंत सामान्यांसाठी लोकल बंद आहे. ती तातडीने सुरू करा, प्रकल्प एवढी वर्षे कागदावर असून कूर्मगतीने पुढे जात आहेत. पण लोकल सेवा बंद असल्याने रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता तरी लोकल सुरू करा.- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष ठाणे रेल्वे प्रवासी संंस्था
२०१२ पासून महिला विशेष लोकलची मागणी प्रलंबित आहे. सातत्याने रेल्वे अधिकारी, बोर्ड, केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार सगळ्यांना पत्रे, भेटी दिल्या. परंतु आठ वर्षांत एकही नवी महिला विशेष लोकल मिळाली नाही. - लता अरगडे, अध्यक्षा, जस्विनी महिला प्रवासी संस्था
एमआरव्हीसीने कल्याण-कसारा, कर्जत, खोपोली मार्गावरील नव्या रेल्वे ट्रॅकचे काम तातडीने पूर्ण करायला हवे. गेल्या १० महिन्यांत काम पूर्णपणे ठप्प आहे. वर्षानुवर्षे रेल्वे प्रकल्प पुढे जात नसतील तर कठीण आहे.- मधू कोटीयन, मुंबई रेल्वे प्रवासी संघ
कल्याण-कसारा, कर्जत मार्गावरील रेल्वेचे प्रकल्प तातडीने मार्गी लागायला हवेत. रेल्वे अधिकारी सकारात्मक असले तरीही निधीची नितांत गरज असते. अनेकदा तो न मिळाल्यामुळे समस्या वाढतात.- राजेश घनघाव, अध्यक्ष, के-थ्री रेल्वे प्रवासी संस्था
बदलापूर, आसनगाव मार्गावर मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण प्रकल्प झाले असून नागरीकरण झपाट्याने होत आहे. त्या तुलनेने रस्ते, रेल्वे सुविधा नाहीत. याबाबत दाद कोणाकडे मागायची? - संजय मेस्त्री, बदलापूर
रेल्वे उड्डाणपूल रखडलेअपघात रोखण्यासाठी रेल्वे फाटक बंद करण्याचा रेल्वेचा संकल्प असला तरीही प्रत्यक्षात दिवा, वासिंद, वडवली, खारेगाव, कल्याण आदी ठिकाणी रेल्वे उड्डाणपुलांची कामे रेंगाळली आहेत. त्यामुळे दिवा स्थानकात फाटक उघडल्यावर त्याचा परिणाम रेल्वे सेवेवर होतो. ठाकुर्ली स्थानकातील फाटकाची समस्या मार्गी लावण्यात रेल्वेसह केडीएमसी प्रशासनाला यश आले आहे. त्या तुलनेने अन्य ठिकाणची समस्या अधिक तीव्र होत असल्याने स्थानिक स्वराज्य संस्था, रेल्वे प्रवासी हैराण झालेे आहेत. दिवा-वसई आणि कर्जत-पनवेल या मार्गावर उपनगरीय लोकल सेवा सुरू करण्यासंदर्भात यापूर्वी हिरवा कंदील दिला असतानाही अद्याप दोन्ही ठिकाणी लोकलसेवा सुरू नाही. दिवा-वसई मार्गावर तर ब्रिटिशकालीन सेवा सुरू असल्याने हजारो प्रवासी त्रस्त आहेत.
रस्त्यांचे भिजत घोंगडेकल्याण-डोंबिवली, कोपर-दिवा तसेच दिवा-ठाणे मार्गावर रेल्वे समांतर रस्ते सुविधा नाही. लोकल बंद पडल्यास चाकरमान्यांना कामावर खाडा, लेटमार्क होतो. समांतर रस्ता हा वाहतुकीला पर्याय असून त्यासंदर्भात सरकार गंभीर नाही. त्यामुळे या जिल्ह्यातील एखाद्या प्रवाशाचा रेल्वे अपघात झाल्यास त्यास ‘गोल्डन अवर’मध्ये वैद्यकीय उपचार मिळत नाहीत. परिणामी अनेकदा अशा घटनांत प्रवाशांचा नाहक जीव जातो, अथवा आयुष्यभर अपंगत्व येते.
काही प्रमाणात पादचारी पुलांचे काम पूर्ण झालेरेल्वेने लॉकडाऊन काळात डोंबिवलीत कोपर उड्डाणपूल तोडला, वालधुनी उड्डाणपुलाची दुरुस्ती केली, पत्री पुलाच्या गर्डर लॉचिंगचे काम केले. डोंबिवली, ठाकुर्ली, टिटवाळा येथील पादचारी पुलांचे काम पूर्ण केले. बदलापूर, खडवली, वासिंद, आसनगाव, उल्हासनगर, भिवंडी रोड, ठाणे, कळवा आदी स्थानकांतील पादचारी पुलांची दुरुस्ती केली.