डोंबिवली: एमआयडीसी आणि 27 गाव परिसरात असलेल्या एमआयडीसीच्या पाइपलाइन फुटणे किंवा त्यातील व्हॉल्व मधील गळती ही नेहमीचीच झाली आहे. आज शनिवारी पहाटे पासून निवासी भागातील डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालय जवळ सर्व्हिस रोडवर पाइपलाइन वरील व्हॉल्व मधून पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती चालू होती.याबद्दल एमआयडीसी अधिकाऱ्यांना कळविले असता एमआयडीसी कर्मचाऱ्यांनी सकाळी नऊ वाजता दुरुस्ती करून पाणी गळती थांबवली. ही गळती अंदाजे चार पाच तास चालू होती. त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाल्याने परिसरातील रहिवाश्यांनी नाराजी व्यक्त केली.
शुक्रवारी पूर्ण दिवस पाइपलाइन दुरुस्ती इत्यादी कारणांसाठी शट डाऊन एमआयडीसी कडून घेण्यात आला होता. तरीही योग्य देखभाल दुरुस्ती अभावी अशा पाण्याच्या गळती होत आहेत. साधारण महिन्याभरात एकदा तरी मोठी पाइपलाइन फुटते आणि व्हॉल्व वरील अशा गळती आठवड्याभरात एकदा तरी होत असते. हे असे होण्याचे कारण म्हणजे अनधिकृत पाणी जोडण्या, पाइपलाइनला भोक पाडून चोरीने पाणी घेणे आणि समाजकंटकाकडून व्हॉल्ववर छेडछाड करणे हे असे आहे.
सद्या महाराष्ट्रातील सर्व धरणात पाण्याच्या साठा कमी झाल्याचे दिसून येत आहे. एप्रिल/मे महिन्यात पाण्याची कमतरता भासणार आहे. काही जिल्ह्यात पाण्याअभावी दुष्काळ पडणार आहे. एमआयडीसीच्या बारवी धरणात पण पाणी हे मागील वर्षापेक्षा कमी आहे. त्यामुळे एमआयडीसी आणि केडीएमसी यांनी पाणी गळती कडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. या सर्व बाबी प्रशासनाला माहिती असूनही याकडे प्रशासन जाणून बुजून लक्ष देत नाही असे दिसते आहे. पाणी गळती वर कडक कारवाई होणे आवश्यक असल्याची मागणी दक्ष नागरिक राजू नलावडे यांनी केली आहे.