डोंबिवली: पाणी नाही तर मतदानही नाही अशी ठाम भूमिका घेऊन नांदीवली येथील टोलेजंग सोसायट्यांमधील शेकडो रहिवासी एकत्र आले आहेत. सातत्याने केवळ आश्वासन मिळत असल्याने लोकसभा निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाच्या उमेदवारांना अश्वासन द्यायला येऊ नका आधी पाणी घेऊन या असा पवित्रा नागरिकांनी घेतला आहे.
पंधरा दिवसांपूर्वी खासदार श्रीकांत शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार राजू पाटील यांच्यासह शहरांतील नेतेमंडळीनी मंत्रालयात सर्व शासकीय यंत्रणांची बैठक घेऊन पाणी द्यायलाच हवे असे महापालिका, एमआयडीसी अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले होते. तिथे हो हो करून अधिकाऱ्यांनी पुन्हा पहिले पाढे पंचावन्न म्हणत काहीही काम केले नाही. गेल्या आठवड्यात महापालिका पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आले आणि म्हणाले आठ दिवस थांबा, आम्ही थांबलो पण काहीही फरक पडलेला नाही. पोरखेळ सुरू आहे का असा सवाल संतप्त महिलांनी केला. आणि त्यामुळेच नो पाणी नो व्होटिंग असा नारा देत त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. शेकडो महिलांना तेथील रहिवासी दक्ष नागरिक सुप्रिया कुलकर्णी यांनी एकत्र केले आणि समस्येला वाचा फोडण्यासाठी निर्णय घेण्याचे आवाहन केल्याचे सांगण्यात आले. महिलांनीही तात्काळ प्रतिसाद देत समस्या आहे त्यावर उपाययोजना का काढली जात नाही.
आयुक्त डॉ इंदूराणी जाखड या सुद्धा एक महिला आहेत, त्यांच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत, पण प्रत्यक्षात काहीच केले जात नाही. राजकीय नेते असोत की अधिकारी सगळे केवळ आश्वासन देऊन वेळ मारून नेतात. आधिकार्यांनी येथे येऊन प्रत्यक्ष रहावे म्हणजे समस्या काय आहे हे समजेल. एसी दालनात बसून काहीही कळणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया महिलांमधून उमटली.
टँकरने किती पाणी मागवायचे, तब्येतीचा प्रश्न निर्माण होतो, सध्या शालांत परीक्षांचा काळ सुरू आहे, नेते, अधिकारी यांना त्याचे काहीच का वाटत नाही. समस्या सोडवा आणि दिलासा द्या अशी मागणी महिलांनी केली.
सर्वोदय ओर्चीड सोसायटीच्या सुचित्रा अय्यर, तृप्ती जाधव महालक्ष्मी आर्केड सोसायटीच्या चंद्रकांत इंदुलकर, राजू त्रिमुखे, अंबर तीर्थ सोसायटीच्या शकुंतला खिल्लारे, मनीषा राणे, धनश्री प्रथमा सोसायटीच्या अमोल राणे, विष्णू सोनवणे, कृष्णकुंज सोसायटीधून नयना हरिया, मेघा मुलंकर कृष्णविहार सोसायटीचे सुनिता विश्वकर्मा, विना सर्वांणकर, शांताराम दर्शन सोसायटीचे सत्यवान शिरवाडकर, शैला ताम्हणे, छाया चव्हाण आदींसह शेकडो महिला एकत्र येऊन आमच्या हक्काचे पाणी आम्हाला मिळायलाच हवे असे म्हणून संताप व्यक्त केला.