कल्याण : महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळाच्या मान्यतेने आणि ठाणे जिल्हा आट्यापाट्या असोसिएशन यांच्या सहकार्याने आरंभ स्पोर्ट्स फाऊंडेशन च्या माध्यमातून एलिट लिगा आट्यापाट्या २०२२ (पर्व पहिले) या स्पर्धेचे पश्चिमेतील नूतन विद्यालय येथे २९ आणि ३० ऑक्टोबर रोजी आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत अजिंक्य राहिलेल्या साऊथ स्कॅल्पर्स या संघावर अंतिम सामन्यात सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवत नॉर्थर्न बिअर्स या संघाने स्पर्धेचे विजेतेपद पटकविले, तर वेस्टर्न टायटन्स आणि ईस्ट ईगल्स या दोन संघांना तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत स्वप्निल महाजन (साऊथ स्कॅल्पर्स) याने मालिकावीर पुरस्कार पटकवला. तसेच दुर्गेश घुमरे (साऊथ स्कॅल्पर्स) उत्कृष्ट संरक्षक, अजिंक्य ढोले (वेस्टर्न टायटन्स) उत्कृष्ट आक्रमक, आदित्य नागरिकर (नॉर्थर्न बिअर्स) उत्कृष्ट सुर ठरले. या स्पर्धेत महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यातून एकूण ४८ खेळाडूंनी आपल्या कौशल्याच्या जोरावर कौतुकास्पद कामगिरी केली.
या स्पर्धेच्या समारोप सोहळ्यासाठी अभिनेते अमित परब, माजी आमदार नरेंद्र पवार, संघमालक प्रतिक थोरात, हकीमुद्दीन वाडलावाला, विजय सपालिगा, हिमांशू सिंग यांच्यासह एलिट लिगा आट्यापाट्या स्पर्धेचे संस्थापक अक्षय बक्कम, अध्यक्ष ओंकार सुर्वे तसेच आरंभ स्पोर्ट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष रोशन सकपाळ, सचिव देवकी कोकाटे, सदस्य सोहम चव्हाण आणि विजय बडगुजर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवछत्रपती पुरस्कार विजेते अंकुर आहेर यांनी केले.