प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: येथील पुर्वेतील वालधुनी, आनंदवाडी तसेच अशोकनगर परिसरातील रेल्वेच्या जागेत राहणा-यांना घरे खाली करण्याच्या नोटीसा रेल्वे प्रशासनाकडून नोटीसा बजावण्यात आल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान रहिवाशांच्या पुनर्वसनाचे धोरण ठरवा आणि त्यांचे पुनर्वसन होईपर्यत त्यांच्या घरावर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश प्रशासनाला प्राधान्याने देण्यात यावेत तसेच सदर पुनर्वसनाबाबत संबंधित अधिकारी यांची आपल्या दालनात बैठक आयोजित करण्यात यावी अशी मागणी रेल्वेचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी पत्राद्वारे केली आहे.
संबंधित रेल्वेच्या जागेवर हजारो नागरीक गेल्या ३५ ते ४० वर्षापासुन घरे बांधुन राहत आहेत. या परिसरातील रहिवाशांना रेल्वेमार्फत घरे रिकामी करण्याच्या नोटीसा देण्यात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत कल्याण पूर्वचे आमदार गायकवाड यांनी संबंधित रहिवाशांची भेट घेतली आणि समस्या जाणून घेतली. यावर गायकवाड यांनी रेल्वेचे केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांना पत्र पाठवले आहे. वालधुनी, आनंदवाडी तसेच अशोकनगर परिसरात अनेक वर्षापासून नागरिक राहत आहेत . केडीएमसीकडे नियमितपणे मालमत्ता कर व पाणी बिल तसेच विद्युत बिल भरत आहेत. रेल्वे कडून या रहिवाशांना नोटीसा पाठवण्यात आल्या असल्यातरी जबरदस्तीने पोलीस बळाचा वापर करून कारवाई केल्यास या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
संबंधित नागरिकांनी रेल्वेने दिलेल्या नोटीसीनुसार संबंधित कागदपत्रे रेल्वे प्रशासन अधिकाऱ्याकडे जमा केली असली तरी कागदपत्रे जमा केले नसल्याचा नोटिसा त्यांना पाठवण्यात आल्या असल्याकडे गायकवाड यांनी पत्रात लक्ष वेधले आहे. सर्व रहिवाशांचे पुनर्वसन करण्याबाबतचे धोरण ठरवुन त्यांचे पुनर्वसन होईपर्यत त्यांच्या घरावर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश अधिका-यांना दयावेत तसेच सदर पुनर्वसनाबाबत संबंधित अधिकारी यांची आपल्या दालनात बैठक आयोजित करावी अशी मागणी दानवे यांच्याकडे आमदार गायकवाड यांनी केली आहे.