कल्याण-कल्याण पूर्व भागातील यू टाईप रस्ते विकास प्रकरणी बाधितांना महापालिका प्रशासनाने नोटिसा बजावल्या आहे. या नोटिसा प्रप्त झाल्याने बाधितांनी हरकती सूचना नोंदविण्यासाठी महापालिका मुख्यालयात भली मोठी रांग लावली होती. या नोटिसा चुकीच्या पद्धतीने बजाविण्यात आल्या असल्याचा आरोप कल्याण पूर्व पुनर्वसन समितीने केला आहे.
पूनर्वसन समितीचे प्रमुख उदय रसाळ यांनी सांगितले की, काटेमानिवली-सिद्धार्थनगर ते तीसगाव नाका हा यू टाईप रस्ता तयार करण्यात येणार आहे. या रस्ते प्रकल्पात १८०० जण बाधित होत आहे. हा रस्ता ८० फूट लांबीचा आहे. हा रस्ता स्टेशनकडे थेट जात नाही. या रस्ते विकास प्रकरणी महापालिकेने बाधितांना बजावलेल्या नोटिसा चुकीच्या पद्धतीच्या आहेत. या रस्त्यावरील फेरीवाले, बेकायदा पार्किग याच्या विरोधात कारवाई करुन रस्ता मोकळा करण्याचा प्रशस्त करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. हा रस्ता ड प्रभागात येत नाही. त्या संदर्भात माहितीसाठी ड प्रभागात केवळ नकाशा लावून ठेवला आहे. या रस्ते विकासाचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला. मात्र कल्याण पूर्व भागातील एकाही नगरसेवकाने रस्ते विकासासाठी ठराव मांडलेला नाही. रस्ते विकासाचा ठराव डोंबिवली आणि कल्याण पश्चिमेतील नगरसेवकांनी मांडला होता.
महापालिका रस्ते विकास करते. मात्र रस्ते विकासात बाधित झालेल्यांचे पुनर्वसन करीत नाही. २० वर्षा पूर्वी महापालिकेच्या रस्ता रुंदीकरणात २२ जण बाधित झाले होते. त्यांचे पुनर्वसन अद्याप झालेले नाही. त्यामुळे पुनर्वसनाची हमी दिली गेली पाहिजे असा आग्रह पुनर्वसन समितीच्या वतीने रसाळ यांनी धरला आहे. कोरोना काळात सामान्य नागरीक भयभीत झाला आहे. आत्ता कुठे कोरोनाच्या संकटातून नागरीक सावरत असताना त्यांना नोटिस पाठवून भयभीत करण्याचा प्रकार महापालिका प्रशासनाकडून केला जात असल्याचे रसाळ यांनी म्हटले आहे.