कल्याण- कल्याण डोंबिवलीतील गायरान जमीनीवरील 30 हजार अतिक्रमणधारकांना कल्याण तहसील कार्यालयाकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार ही अतिक्रमणे हटविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे 30 हजार अतिक्रमणधारक हवालदिल झाले आहे. या नोटिसांचा पूनर्विचार व्हावा या मागणीसाठी नोटिस प्राप्त झालेल्या नागरीकांची काल सायंकाळी मोठा गाव ठाकूर्ली येथील नवनाथ मंदिर एक मोठी जाहिर सभा पार पडली. सरकारने ही कारवाई मागे घ्यावी अशी मागणी या सभेत जाहिरपणो समस्त नागरीकांनी केली.
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे युवा सेना पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी काल नवनाथ मंदिरात सभा घेतली. या सभेला पदाधिरी सचिन म्हात्रे यांच्यासह पोलिस पाटील जयेश भोईर आणि असंख्य ग्रामस्थ नागरीक उपस्थित होते. गायरान जमीनीवर अतिक्रमणे आणि बांधकामे का झाली याला सरकारचीच निती जबाबदार आहे. ग्रामपंचायत असल्यापासून या गायरान जमिनी होत्या आणि आहेत. ग्रामपंचायतीनंतर काही ठिकाणी नगरपरिषदा स्थापन झाल्या.
लोकसंख्या वाढीनंतर त्याचे महापालिकेत रुपांतर झाले. ही रुपांतराची प्रक्रिया होत असताना गायरान जमिनी तशाच होत्या. लोकसंख्या वाढत असताना गावठाण जमिनीचा विस्तार होणो अपेक्षित होते. मात्र त्याचा विस्तार केला गेला नाही. त्या जमिनीवर घरे बांधली गेली. ही घरे गेली 40 वर्षे जुनी आहेत. त्यांना आत्ता हटविण्याचे आदेश दिले जात आहे. तेही पंजाब न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेच्या आधारे महाराष्ट्र सरकारला ही त्याच धर्तीवर निर्णय घेण्यास सांगितले जात आहे.
न्यायालयाच्या आदेशाचा अतिक्रमण धारक सन्मान करीत आहेत. मात्र सरकारने या सगळ्य़ाचा पुनर्विचार करावा. एकाच वेळी 30 हजार पेक्षा जास्त लोक या कारवाईमुळे बेघर होऊ शकतात. आत्ता कुठे दोन वर्षानंतर नागरीक कोरानाच्या संकटातून सावरत असताना त्यांच्या घरांवर पुन्हा कारवाईची टांगती तलवार असेल तर त्यांनी जायचे कुठे असा सवाल युवा सेना पदाधिकारी म्हात्रे यांच्यासह नागरीकांनी उपस्थित केला आहे. कारवाई करण्यापेक्षा ज्यांची घरे 20 वर्षापेक्षा जास्त जुनी आहे. त्यांना पट्टा कराराने 99 वर्षाकरीता लिजवर द्या अशीही मागणी या सभेच्या निमित्ताने पुढे आली आहे.