लाेकमत न्यूज नेटवर्क, कल्याण : पिसवली येथे सापडलेली मतदार ओळखपत्रे ही जुनी आहेत. त्याचा मतदानासाठी वापर होणे याची एक टक्काही शक्यता नाही. या प्रकरणी पाच बीएलओंना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत, अशी माहिती कल्याण मतदार नोंदणी अधिकारी विश्वास गुजर यांनी दिली आहे.
गुजर यांनी सांगितले की, ७२० जुनी मतदार ओळखपत्रे सापडली आहेत. त्यापैकी ६७९ मतदार ओळखपत्रे ही २००६ ते २०१४ दरम्यानची आहेत. ४१ स्मार्ट कार्ड ही २०१७ ते २०२१ कालावधीतील आहे. ही बाब कल्याण डोंबिवली महापालिका शिक्षणाधिकारी आणि ठाणे महापालिकेचे दिवा विभागाचे सहायक आयुक्त यांच्या लक्षात आणून दिली आहे.
कल्याण पूर्वेतील महापालिकेच्या नेतीवली येथील शाळेत ही मतदार ओळखपत्रे रद्दी म्हणून ठेवली होती. रद्दी एका गोणीत भरून एका टेम्पोतून दुसरीकडे नेली जात होती. त्यापैकी एक गोणी पिसवलीजवळ पडली. त्या गोणीत ही ओळखपत्रे होती. त्या गोणीत काही विद्यार्थ्यांचे शालेय निकालही होते. त्यामुळे ही ओळखपत्रे कुठून कोठे नेली जात होती, याचा पत्ता लागला आहे.
‘कल्याण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक रद्द करा’मतदार ओळखपत्रे सापडल्याने शुक्रवारी उद्धवसेनेने मानपाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली. ही मतदार ओळखपत्रे खरी आहे की बनावट? याचा शोध घ्यावा, या ओळखपत्रांच्या आधारेच शिंदेसेनेचा उमेदवार कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्याचा संशय व्यक्त करीत निवडणूक आयोगाने या मतदारसंघातील निवडणूक रद्द करावी, अशा मागणीचे निवेदन कल्याण लोकसभा मतदारसंघातील उद्धवसेनेच्या पराभूत उमेदवार वैशाली दरेकर यांनी मानपाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राम चोपडे यांना दिले. या प्रसंगी जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, धनंजय बोडारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
‘ती’ ओळखपत्रे खरी
- मतदार ओळखपत्रे सापडल्याची माहिती मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने यांनी कल्याण तहसील कार्यालयातील नायब तहसीलदारांना दिली. - तहसीलदारांनी तपासणी केली असता ही ओळखपत्रे खरी असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पाेलिसांनी सांगितले.