कल्याण- कल्याण तालुक्यातील गुरचरण जमीनीवरील अतिक्रमणधारकांना कल्याण तहसील कार्यालयाकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. आत्तापर्यंत २ हजार जणांना आत्तार्पयत नोटिसा बजावून सात दिवसात जागा खाली असे बजावले आहे. अन्यथा तहसील कार्यालयाकडून कारवाई केली जाईल. या नोटिसामुळे हजारो नागरीक हवालदिल झाले आहे.
कल्याण तालुक्यात जवळपास २७ तलाठी आहे. या तलाठ्यामार्फत आत्तापर्यंत २ हजार जणांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहे. गुरचरण जमिनी या सरकारी असून त्या गुरांच्या चरण्यासाठी राखीव असतात. मात्र अनेकानी या जमिनीवर अतिक्रमण केले आहे. या प्रकरणी पंजाब राज्यातील न्यायालयात याचिका न्याय प्रविष्ट आहे. या याचिकेच्या आधारे राज्यातील गुरचरण जमीनीवर अतिक्रमण या वर्षा अखेर निष्कासीत करणे आवश्यक आहे असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले आहेत. त्या आदेशानुसार कल्याण तहसील कार्यालयातून नागरीकाना नोटिसा पाठविण्याचे काम सुरु आहे.
कल्याण तालुक्यात १०० पेक्षा जास्त गावे आहे. तालुक्याचे क्षेत्रफळ सहा हजार ५७१ हेक्टर इतके आहे. यापैकी गुरचरण जमिनीवर अतिक्रमण झाले आहे. तहसील कार्यालयाकडून नोटिसा दिल्या जात असल्या तरी त्याचा पुढील निर्णय हा न्यायालय अथवा सरकार घेऊ शकते असे सरकारी यंत्रणे कडून सांगण्यात येत आहे. कल्याण पूर्व भागातील कचोरे येथे राहणारे सुभाष वर्मा यांनाही नोटिस आलेली आहे. त्यांनी सांगितले की, कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत राहतात.त्यांच्या घराला महापालिकेचा टॅक्स आहे. महापालिकेस टॅक्स भरल्यावर त्यांची मालमत्ता बेकायदा कशी काय असा सवाल वर्मा यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान माजी महापौर रमेश जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे की, हजारो लोक या गुरचरण जमीनीवर वास्तव्य करुन आहेत. त्यांच्याविरोधात कारवाई केल्यास ते बेघर होतील. न्यायालयाचे आदेश असले तरी राज्य सरकारने या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. सरकारने या प्रकरणी लक्ष देऊन नागरीकांना दिलासा द्यावा.