डोंबिवली : येथील टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाला वाणिज्य शाखेची पदवी महाविद्यालय हे टिळकनगर येथे सुरु करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने मान्यता दिल्याची माहिती बुधवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे आता शहरातील डिग्री कॉलेजमध्ये भर पडली असून येथे ५ महाविद्यालय झाली आहेत. याआधी के व्ही पेंढरकर, प्रगती, मॉडेल, स्वामी विवेकानंद रात्र महाविद्यालय अशी डिग्रीची महाविद्यालय शहरात असून त्यात आता टिळकनगर डिग्री कॉलेज ऑफ कॉमर्सची भर पडली आहे.
या नव्या डिग्री कॉलेजच्या कॉमर्स शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या १२० विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रवेश मिळू शकतो. स्पर्धेच्या युगात या महाविद्यालयामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. टिळकनगर शाळा, ज्यूनिअर काँलेज, गुरुकुल शाळा, भाषावर्धिनी चार विदेशी भाषा शिकण्याचे केंद्र अशा शैक्षणिक क्षेत्रातील विविध उपक्रम राबविण्याऱ्या डोंबिवलीतील टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिरपेचात हा आणखी एक मानाचा तुरा आहे,असे मंडळाचे कार्यवाह आशीर्वाद बोंद्रे म्हणाले.
तसेच विद्यार्थ्यांनी प्रथम वर्ष वाणिज्य शाखेत प्रवेश घेण्यासाठी टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या टिळकनगर शाळेतील कार्यालयात सकाळी ११ ते ६ या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहनही बोंद्रे यांनी केले आहे. या ठिकाणी १२० विद्यार्थ्यांना फर्स्ट इयर (तेरावी)साठी प्रवेश उपलब्ध असून मेरिट आणि टक्केवारीचा चढता क्रम या शैक्षणिक तत्वावर त्या ठिकाणी अॅडमिशन उपलब्ध असेल असेही सांगण्यात आले.