लोकमत न्यूज नेटवर्क : कल्याण
कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत काही दिवसांपूर्वी लसींच्या तुडवड्यामुळे लसीकरणाची मोहीम काहीशी थंडावली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून लसीकरण मोहिमेनं वेग घेतला असून आतापर्यंत 13 लाखांहूनही अधिक नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे. त्याचप्रमाणे पालिकेकडे लसींचा मुबलक साठा उपलब्ध असल्याने नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
महापालिका क्षेत्रात आतापर्यंत एकुण 8 लाख98 हजार 90 नागरिकांनी कोविड लसीची पहिली मात्रा घेतली आहे तर एकुण 4 लाख 49 हजार 46 नागरिकांनी लसीची दुसरी मात्रा घेतली आहे. आतापर्यंत 13 लाख 47 हजार 136 इतक्या नागरिकांचं लसीकरण महापालिका क्षेत्रात झाले आहे.लसीकरण केल्याने संबंधीत व्यक्तीस संसर्गाचा धोका कमी असतो आणि त्यास कोविड झाल्यास त्याचा प्रादुर्भावही कमी प्रमाणात राहतो. तसेच कोविड लसीकरणामुळे मृत्यूचे प्रमाणही कमी होते. महापालिकेत आता मुबलक प्रमाणात लस साठा शासनाकडून उपलब्ध होत आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरणास प्रतिसाद दिल्यास महापालिका क्षेत्रातील कोविडचा संसर्ग कमी होण्यास तसेच येणा-या तिस-या लाटेला थोपविण्यास मदत होऊ शकेल, तरी महापालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या घरा नजिकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन आपले कोविड लसीकरण करावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी मोबाईल व्हॅन लसीकरणानंतर आता घरोघरी जाऊन लसीकरण मोहीम सुरू करण्यात आल्याने नागरिकांमधूण समाधान व्यक्त केलं जातं आहे. आगामी काळात जास्तीत जास्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचं लसीकरण करण्याचं केडीएमसीचं लक्ष असणार आहे.