कल्याण-जुन्या मुंबई-पुणे मार्गावर कल्याण शीळफाटा ते दहिसर दरम्यान भंगारवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे नैसर्गिक नाल्याचा प्रवास खुंटला आहे. रस्यालगचे अतिक्रमण दूर करुन नाल्याचा प्रवाह मोकळा करण्याकरीता मनसे आमदार राजू पाटील यांनी संबंधित अधिकारी वर्गाची काल बैठक घेतली. दहिसर येथे घेण्यात आलेल्या बैठकीत त्यांनी अधिकारी वर्गास धारेवर धरुन रस्ता अतिक्रमणमुक्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जुन्या मुंबई- पूणे मार्गावरील कल्याण शीळ फाटा ते दहीसर दरम्यान अवजड वाहनांची वाहतूक जास्त असते. तसेच रस्त्याच्या लगत भंगारची दुकाने जास्त आहे. ही बेकायदेशीर भंगार दुकाने ग्रामस्थांकरीता त्रसधादायक ठरत आहेत. रस्ता अतिक्रमणमुक्त करण्यासाठी मनसे आमदारांनी घेतलेल्या बैठकीत तहसीदरा, वनविभागाचे अधिकारी, डायघर पोलिस, राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी, १४ गाव संघर्ष समितीचे पदाधिकारी, वाहतूक पोलिस आदी उपस्थित होते. नाल्याचे नैसर्गिक प्रवाह भंगार दुकानवाल्यांनी बुजविले आहेत. तसेच भंगारवाले केमिकलचे जे ड्रम भंगारात घेतात. त्यातून शिल्लक असलेले रसायन हे इतत्र टाकले जाते. नैसर्गिक नाले बुजविल्याने पावसाळ्य़ात पाणी तूंबते. तसेच रासायनिक कच:यामुळे शेतजमीनी खराब होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी या बैठकीत केली. त्याचबरोबर तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अश्वीनी जोशी यांनी कारवाई केली होती. त्याची आठवण ग्रामस्थांनी यावेळी अधिकारी वर्गास करुन दिली. या बैठकीस प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित नव्हते. रसायनिक कचरा हा शेतात टाकल्याने शेती खराब होत असल्याची तक्रार ही गंभीर स्वरुपाची असून त्याची दखल प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेऊन त्यानुसार संबंधितांच्या विरोधात कारवाई केली पाहिजे असे आमदारांनी पोलिसांना सांगितले. ही गंभीर समस्या लक्षात घेता ती दूर करण्यासाठी अधिकारी वर्गाने एक अॅक्शन प्लान तयार करावा असे मनसे आमदार पाटील यानी अधिकारी वर्गास सूचित केले आहे.