डोंबिवली : खड्ड्यांच्या मुद्यावर रिपब्लीकन रिक्षा चालक मालक युनियनच्या वतीने आज केडीएमसीच्या येथील सुनिलनगर भागातील ग प्रभागक्षेत्र कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. गार्डीयन स्कुल, देसलेपाडा, नांदीवली रोड, या मार्गे सुनिलनगर असा हा मोर्चा युनियनचे अध्यक्ष रामा काकडे यांच्या नेतृत्वाखाली काढला होता. रस्त्यातील खड्डे तातडीने बुजविण्याबाबत मनपाच्या बांधकाम विभागाला पत्र दिले होते. परंतू दखल घेतली न गेल्याने हा मोर्चा काढण्यात आल्याचे काकडे यांनी सांगितले.
खड्डयांमुळे रिक्षाचे नुकसान झाल्यास महापालिकेने पंचनामा करुन आर्थिक नुकसान भरपाई दयावी, आधुनिक यंत्रणा वापरून खड्डे बुजवण्यात यावे, रिक्षाचालकांना खड्डयांमुळे पाठीचे व मानेचे विकार जडले आहेत यावर योग्य ते वैद्यकीय उपचार मोफत करण्यात यावेत अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. आमच्या मागण्या मान्य न केल्यास यापुढे आणखीन तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा काकडे यांनी दिला.
रिक्षा चालकांचा गणवेश नसेलतर ज्याप्रमाणे आरटीओकडून दंड आकारला जातो त्याप्रमाणे खड्ड्यांप्रकरणी कंत्राटदाराला देखील मनपाने दंड आकारावा याकडेही त्यांनी लक्ष वेधले. यावर युद्धपातळीवर रस्त्यातील खड्डे बुजवले जात असून प्रशासनाचे यावर पूर्ण लक्ष असल्याचे मनपाच्या अधिका-यांकडून शिष्टमंडळाला सांगण्यात आले.