कल्याण : आषाढी एकादशीनिमित्त पश्चिमेकडील कर्णिक रोड येथील नूतन विद्यालय, इंडियन मेडिकल असोसिएशन, कल्याण व कल्याण संस्कृती मंचातर्फे गुरुवारी सकाळी दिंडीचे आयोजन केले होते. या दिंडीमध्ये शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक त्याचबरोबर डॉक्टर्स, संस्था पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. वारकरी वेशभूषेत विद्यार्थ्यांनी दिंडी नृत्य व चिमुरड्यांनी टाळ नृत्य सादर केले. शाळेतील ज्येष्ठ कला शिक्षक श्रीहरी पवळे यांच्यासह ५ वी ते ९ तील २० विद्यार्थ्यांनी चितारलेल्या विठ्ठलमय चित्रांचे शाळेत प्रदर्शन भरविण्यात आले होते.
विठ्ठलाच्या पालखीचे पूजन करण्यात आले. डॉक्टरांनी विठुरायाची आणि रखुमाईची वेशभूषा केली होती. तसेच, विद्यार्थी देखील विठ्ठल रखुमाई आणि संताच्या वेशभूषेत अवतरले होते. मैदानात रिंगण सोहळा पार पडल्यानंतर पालखीने विठ्ठल मंदिराच्या दिशेने प्रयाण केले. फुगड्या, रिंगण,जयघोषात सर्वजण तल्लीन झाले होते. दिंडीच्या निमित्ताने पर्यावरण संवर्धन, देह अवयवदान चळवळ व प्लास्टिक मुक्तीचा संदेश देण्यात आला.
यावेळी, छत्रपती शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष अशोक प्रधान, कोष्याध्यक्ष धनंजय पाठक, चिटणीस भारती वेदपाठक, पूर्व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका दीपाली साबळे, शालेय समिती सदस्य अविनाश नेवे यांच्यासह डॉ. प्रशांत पाटील, डॉ. अश्विन कक्कर, डॉ. स्वाती आगाशे, केडीएमसीचे सचिव संजय जाधव सचिव, विकासक राजेश भोईर तसेच, माध्यमिक व प्राथमिकचे सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी भोसले यांनी केले. डॉक्टरांच्या टीमकडून सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.