कल्याण: सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ, कल्याण पूर्व यांच्यावतीने यंदाही शिवजयंती निमित्ताने श्री शिवसंस्कार महोत्सवाचे आयोजन केले आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी आजपासून सुरू झालेल्या या महोत्सवाच्या ठिकाणी पुर्वेकडील तिसगावमधील आई जरीमरी तिसाई मंदिर परिसरात ४ फूट बाय ४० फूट मापात ‘जय शिवराय’ या अक्षराच्या आकाराची पुस्तकरूपी भव्य मांडणी साकारली आहे. या मांडणीमध्ये नागरिकांनी किमान एक पुस्तक आणून द्यावे असे आवाहन उत्सव मंडळाने केले आहे.
यंदाचे महोत्सवाचे ३७ वे वर्ष आहे. रविवारी शिवजयंती दिनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य प्रेरणा यात्रेने महोत्सवाचा समारोप होणार आहे. शहरातील इतर मंडळ देखील चित्ररथ घेऊन या प्रेरणायात्रेत सहभागी होणार आहेत. दरम्यान ‘जय शिवराय’ पुस्तक मांडणी उपक्रम तीन दिवस चालणार आहे. पुस्तक मांडणी अंतर्गत जी पुस्तके जमतील ती पुस्तके शाळा आणि वाचनालयांना देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या साकारलेल्या मांडणीची इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्डमध्ये व इतर काही रेकॉर्डसमध्ये नोंद होणार आहे. दिल्लीमध्ये तीन दिवसात जास्त पुस्तके जमा करण्याचा रेकॉर्ड झाला आहे. पण अद्यापर्पयत जगात शब्दांची मांडणी करणारा साकारलेला लेआऊट पहिल्यांदा होत आहे. त्यामुळे तो विक्रम उत्सव मंडळ आणि कल्याण पूर्वच्या नावे होऊ शकतो असे सांगण्यात आले. मंडळाने मागील वर्षी तुळशीच्या रोपांपासून शिवाजी महाराजांच्या चेह-याची प्रतिकृती साकारली होती.
मान्यवरांची लाभणार उपस्थिती
महोत्सवाला केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार डॉ श्रीकांत शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार गणपत गायकवाड, मनसे आमदार राजू पाटील, अखिल भारतीय औषध विक्रे ता संघटनेचे अध्यक्ष व माजी आमदार जगन्नाथ शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवाची माहिती देण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला अध्यक्ष रूपेश गायकवाड, सचिव राजु अंकुश, संस्थापक अध्यक्ष भगवान भोईर, विश्वस्त नरेंद्र (नाना) सुर्यवंशी, विलास उतेकर, रागेश पिल्ले यांसह अन्य पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.