कल्याण-आपल्या पूर्वजांनी मुघलांकडून आपली मंदिरे पाडताना बघितली होते. मुघलांनी पाडलेली मंदिरे पुन्हा उभारून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशामध्ये एक नवा अध्याय रचत असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली आहे. मंत्री पाटील यांच्या भिवंडी लोकसभेतून दीड हजार रामभक्तांना घेऊन विशेष ट्रेन अयोध्येला रवाना झाली. त्यावेळी पाटील यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
भाजपने आपल्या सर्व कार्यकर्त्यांना अयोध्येला पाठवण्याचा संकल्प केला आहे. प्रभू श्रीराम मंदिरात यांच्या मूर्तीसोबतच देशातील १४० कोटी लोकांच्या आस्थेची, संस्कृतीची, सभ्यतेची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. हा अनुभव आपल्या सर्व सहकाऱ्यांना प्रत्यक्ष घेता यावा म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला. रामभक्तांना अयोध्येला घेऊन जाणारी विशेष ट्रेन कल्याण स्टेशनवरून रवाना झाल्यानंतर प्लॅटफॉर्म नंबर सहावर कार्यकर्त्यांकडून केक कापून मंत्री पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावर बोलताना पाटील यांनी सांगितले की कदाचित प्रभू श्रीरामाच्या मनातच असे असावे की इकडून रवाना होणाऱ्या कार्यकर्त्यांसोबत तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचवा. आणि मग याच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपण आपले आशिर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचवतो असे सांगत कपिल पाटील यांनी आगामी निवडणुकीतील विजयाबाबत विश्वास व्यक्त केला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सुर्यवंशी, कल्याण पश्चिम शहराध्यक्ष वरुण पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.