Badlapur School Crime :बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना समोर आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. या घटनेच्या नंतर आठवड्याभराने हे प्रकरण समोर आल्याने आणि पोलिसांनी सुरुवातीला योग्य ती कारवाई न केल्यामुळे बदलापुरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत हजार बदलापूरकर रस्त्यावर उतरले होते. शेकडो आंदोलकांनी तब्बल १० तास बदलापूर स्थानकावर ठिय्या दिला होता. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करत आंदोलकांना पांगवले होते. मात्र यानंतर बदलापूर पोलिसांनी कठोर कारवाई करत ३०० जणांवर गुन्हा दाखल केला होता. यापैकी ४० हून अधिक जणांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर आंदोलकांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
मनसे पदाधिकाऱ्यांनी हे प्रकरण समोर आणत शाळेतील हा प्रकार उघड केला होता. या घटनेमुळे बदलापूरा जनक्षोभ उसळला होता. या घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बदलापूरला भेट दिली होती. भेटीदरम्यान त्यांनी आंदोलनात गुन्हे दाखल असलेल्या पालकांशी, मनसे महिला पदाधिकारी, महिला पत्रकार यांच्याशी संवाद साधला होता. यावेळी एका महिलेने माझेही पती अटकेत असल्याची माहिती राज ठाकरे यांना दिली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना आदेश देऊन तात्काळ जामीन मिळवून देण्यास सांगितले होते. अखेर १० दिवसांनी महिलेच्या पतीची जामीनावर सुटका करण्यात आली आहे.
राज ठाकरे यांनी बदलापूर संवाद दौऱ्यानिमित आंदोलनकर्ते, पालक तसेच पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी बदलापूरमधील कल्पना मारुती खेडेकर या महिलेने माझे पती ९-१० दिवसांपासून अटकेत आहेत, त्यांची अजून सुटका झाली नाही अशी व्यथा राज ठाकरे यांच्याकडे मांडली होती. त्यावेळी राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. राज ठाकरे यांनी दिलेल्या सूचनेनंतर पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केल्यानंतर शुक्रवारी महिलेचे पती मारुती महादू खेडेकर यांची चोपडा कोर्ट उल्हासनगर येथून जामिनावर सुटका करण्यात आली.