कल्याण : अनैतिक कृत्य करण्याच्या इराद्याने एका अल्पवयीन मुलीला झाडाझुडपात घेऊन जाणाऱ्या पिंट्या देवमन जाधव (३५, रा. अहमदनगर) याला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. ए. डी. हर्णे यांनी तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
सप्टेंबर २०१९ मध्ये पीडिता घराजवळ दुध आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी, पिंट्याने पिडीतेला रस्त्यात अडवले व तिचे केस पकडून तिला उचलून घेतले. या प्रकारामुळे घाबरलेल्या पिडीतेने आरडओरडा केला. त्यावेळी, तेथून जाणाऱ्या दोघांना संशय आल्याने त्यांनी पिडीतेला पिंट्याच्या तावडीतून सोडवले.
याप्रकरणी पिडीतेच्या आईच्या तक्रारीवरून अंबरनाथ पोलिसांनी पिंट्याविरोधात गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी गजानन कोचरेकर यांनी कल्याण न्यायालयात आरोपपत्र सादर केले. सहायक सरकारी वकील अश्विनी भामरे-पाटील यांनी कामकाज पाहिले. त्यांना कोर्ट पैरवी पोलीस हवालदार भालचंद्र द. पवार यांनी मदत केली.