डोंबिवली : कोरोनाच्या संकटामुळे राज्य सरकारने जून २०२० पासून ऑनलाइन शिक्षणपद्धतीवर भर दिला. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून सरकारने डिजिटल पद्धतीचा अवलंब केला आहे. मात्र, मोबाइल आणि संगणकाच्या अतिवापरामुळे लहान मुलांमध्ये डोळ्यांचे आजार वाढत आहेत. त्यावर वेळीच उपचार घ्यावेत, असा सल्ला नेत्रतज्ज्ञ डॉ. अनघा हेरूर यांनी नुकताच दिला.
हेरूर यांनी यावेळी डोळ्यांसंबंधीचे आजार आणि म्युकरमायकाेसिसबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या की, सध्या कोविडकाळात शासनाने कठोर निर्णय घेऊन वर्क फ्रॉम होम व ऑनलाइन शिक्षण सुरू केले आहे. मात्र, यामुळे डोळ्यांचे आजार बळावले आहेत. सध्या म्युकरमायकोसिस हा रोग वाढत असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी डोळ्यांची नियमित तपासणी करून घेणे हिताचे आहे, असे त्यांनी सांगितले.
आजकाल काम आणि खेळ दोन्हींसाठी एकच तंत्रज्ञान वापरले जाते. त्यामुळे मोबाइल, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप, टॅबलेटची स्क्रीन समाेर असते. स्क्रीनवर एकटक बघत राहिल्याने डोळ्यांची उघडझाप कमी होऊन डोळ्यांवर ताण येताे. त्यामुळे डोळ्यांची जळजळ, कोरडेपणा, डोळे जडावणे, डोकेदुखी असे त्रास सुरू होतात. डिजिटल साधने वापरायची असतील, तर तासाभरात किमान तीन वेळा २० सेकंद ब्रेक घेणे आवश्यक आहे. स्क्रीन आणि बसण्याची पद्धत याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
जनजागृतीकडे होतोय शाळांचा कानाडोळा
ऑनलाइन शिक्षणपद्धतीमुळे लहान मुलांच्या डोळ्यांच्या आजारांत वाढ झाली आहे. असे आजार होऊ नयेत, यासाठी घ्यायची काळजी व उपाययोजना यावर माहिती देण्यासाठी हेरूर यांनी डोंबिवलीतील शाळांना संपर्क केला होता. पालक, पाल्य यांच्यात आठवड्यातून जनजागृती करणे गरजेचे आहे, यासाठी कोणतेही शुल्क आकारणार नसल्याचे हेरूर यांनी शाळा व्यवस्थापनांना सांगितले होते. मात्र, अजूनही शाळांनी या विषयावर जनजागृतीसाठी पुढाकार घेतला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.