डोंबिवली: महावितरणच्या कल्याण परिमंडलात सप्टेंबर महिन्यात रांगेतील गर्दी टाळून ७५ टक्के लघुदाब ग्राहकांनी आपल्या वीजबिलाचा ऑनलाईन भरणा केला. परिमंडलातील उर्वरित २५ टक्के वीज ग्राहकांनीही त्यांच्या चालू वीजबिल तसेच थकबाकीचा भरणा करण्यासाठी सुरक्षित व सुलभ अशा ऑनलाईन पर्यायांचा वापर करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर केवळ ग्राहक क्रमांक नमूद करून नेटबँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्डसह मोबाईल वॅलेट व कॅश कार्ड्सचा उपयोग करून वीजबिलाचा ऑनलाईन भरणा करता येतो.
हेच पर्याय वापरून महावितरणच्या मोबाईल ॲपवरून बिल भरण्याची सुविधा आहे. भीम ॲप किंवा इतर उपलब्ध पेमेंट वॅलेटच्या माध्यमातून वीजबिलाचा ऑनलाईन भरणा सुलभ व सुरक्षित आहे. रांगेत थांबून वेळ वाया घालवण्याऐवजी ऑनलाईनचा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना वेळ व पैशांच्या बचतीची सुविधा मिळते. ऑनलाईन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या वीजबिलाच्या रकमेत पाव टक्का (कमाल ५०० रुपयांपर्यंत) सवलत पुढील महिन्याच्या वीजबिलात मिळते. परिमंडलातील १६ लाख ३२ हजार ६०६ लघुदाब ग्राहकांनी सप्टेंबर महिन्यात त्यांच्या ३७४ कोटी रुपयांच्या वीजबिलाचा ऑनलाईन भरणा केला आहे. एकूण लघुदाब ग्राहकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण ७५ टक्के असून उर्वरित ग्राहकांनीही त्यांचे वीजबिल भरण्यासाठी ऑनलाईनचा पर्याय निवडण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
कल्याण मंडल कार्यालय एक अंतर्गत डोंबिवली व कल्याणमधील ४ लाख ४४ हजार ७८३ ग्राहकांनी ८८ कोटी, कल्याण मंडल कार्यालय दोन अंतर्गत कल्याण ग्रामीण, बदलापूर, मुरबाड, शहापूर, उल्हासनगर, अंबरनाथ येथील ३ लाख ९३ हजार ५१४ ग्राहकांनी ९२ कोटी, वसई मंडल कार्यालयांतर्गत वसई, वाडा, विरार, नालासोपारा, आचोळे परिसरातील ६ लाख १२ हजार ९१४ ग्राहकांनी त्यांच्या १५४ कोटी, तर पालघर मंडल कार्यालयांतर्गत बोईसर, डहाणू, जव्हार, मोखाडा, पालघर, तलासरी, विक्रमगड येथील १ लाख ८१ हजार ३९५ ग्राहकांनी ४० कोटी रुपयांचे वीजबिल डिजिटल सुविधांचा वापर करून ऑनलाईन भरले आहे.