डोंबिवली: येथील एमआयडीसी निवासी भागात रस्ते काँक्रीटीकरणाची कामे चालू असून येथील सर्वच रस्ते काँक्रिटचे करण्यात येतील अशी फलकबाजी यापूर्वी करण्यात आली होती. पण आता फक्त ठराविक रस्त्यांचेच काँक्रीटीकरण करण्यात येणार असल्याचे समजल्याने येथील स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. ज्या ठराविक रस्त्यांचे काँक्रीटीकरण चालू आहे ते रस्ते देखील चुकीच्या नियोजनामुळे पुन्हा खोदावे लागत आहेत. याचा निषेध म्हणून रविवारी नागरिकांनी तोंडावर मास्क बांधत हातात निषेधाचे फलक घेत मुक आंदोलन छेडले.
निवासी भागातील मॉडेल कॉलेज भागातील भाजी गल्ली रोडवर सकाळी १० वाजताा छेडल्या गेलेल्या आंदोलनात सुमारे १५० नागरिकांनी सहभाग घेतला होता. एक तास रस्त्याचा दुतर्फा कडेला उभे राहून त्यांनी हे आंदोलन छेडले. निवासी भागातील सर्वच रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात यावे, काँक्रिटचे रस्ते निवडणुकीच्या आधी नाही झाले तर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार, धुळीने आम्हाला झाला आजार रस्त्यामुळे आम्ही झालो बेजार, आश्वासन फलक होते विभागातील सर्वच रस्त्यांचे काँक्रिटीकरण पण आता बनवले ठराविक रस्ते, हाय हाय एमएमआरडीए, केडीएमसी, एमआयडीसी हाय हाय असे लिहिलेले फलक आंदोलनकर्त्यांच्या हाती होते. भोंगळ कारभाराचा नागरिकांना त्रास
नव्याने बनविलेल्या काँक्रिट रस्त्यावर एमआयडीसीकडून नवीन सांडपाणी वाहिन्या तसेच चेंबर टाकण्यात येणार असल्याने हे नवीन रस्ते दोन्ही बाजूंनी तोडण्यात येणार आहेत. पायवाट साठी पेवरब्लॉक टाकण्याचे काम एमआयडीसीच्या सांगण्यानुसार एमएमआरडीएचा ठेकेदाराने बंद केले आहे. वीज, पाणी, सांडपाणी वाहिन्या आणि महावितरणचे डीपी बॉक्स, ट्रान्सफॉर्मर हे काही ठिकाणी रस्त्यांच्यामध्ये आल्याने ते दुरुस्ती करतेवेळी नवीन काँक्रिट रस्ते तोडावे लागत आहेत याकडेही आंदोलनात लक्ष वेधण्यात आले. या एकंदरीतच भोंगळ कारभाराचा मूक आंदोलनाद्वारे निषेध करण्यात आला.
...तर भव्य मोर्चा काढणार
इथल्या समस्यांबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना याआधी अनेकदा कळविण्यात आले होते शिवाय पत्रव्यवहारही करण्यात आला होता. आता पुन्हा येथील सर्व समस्यांसाठी नागरिकांच्या सह्यानिशी पत्र देण्यात येणार आहे. जर त्यातूनही येथील समस्यांची दखल घेतली गेली नाही तर एक भव्य मोर्चा स्थानिक नागरिकांतर्फे काढण्यात येणार आहे.