मुरलीधर भवार-डोंबिवली - पलावा जंक्शन उड्डाण पुलाचे काम संथ गतीने सुरु आहे. त्याठिकाणी केवळ चार मजूर काम करीत आहेत. अशा प्रकारे काम केल्यास काम कसे काय मार्गी लागणार ? असा संतप्त सवाल मनसेचे आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला आहे .आज आमदार पाटील यांनी पूलाच्या कामाची पाहणी केली. या वेळी एमएसआरडीसीचे सह संचालक मनोज जिंदाल हे देखील उपस्थित होते. पुलाचे काम संथ गतीने सुरु असल्याने कंत्राटदाराला दंड ठोठावण्याच्या सूचना देत कारवाई करण्याचा इशारा सह संचलाक जिंदाल यांनी दिला आहे.
भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याचे सहा पदरी सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचे काम ८० टक्के झाले आहे. या रस्त्यावर दिवा पनवेल रेल्वे मार्गावरील जुना पूल आहे. तसचे नवा पूलही अस्तित्वात आहे. कल्याणहून शीळ फाट्याकडे जाताना जुन्या रेल्वे उड्डाणपूलाचा वापर वाहतूकीसाठी केला जात आहे. पुढे पलावा जंक्शन आहे. याशिवाय पूढे देसाई खाडीवरही पूल आहे. देसाई खाडी ते निळजे गावापर्यंत पलावा जंक्शन क्रा’स करुन पूलाचे काम सुरु आहे. या पलावा जंक्शन पूलामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदतत होणार आहे. पलावा स्मार्ट सिटीतून निघणारी वाहने खालच्या रस्त्यावरून जातील. तसेच ज्या वाहना पलावा येथे जायचे नाही. ती वाहने उड्डाणपूलाचा वापर करती. या पूलाचे काम गेल्या काही वर्षापासून सुरु आहे. या पूलाची एक मार्गीका फेब्रुवारी २०२४ मध्ये खुली करण्या येईल असे एमएसआरडीसीने सांगितले होते. आत्ता कल्याण तळोजा आणि ठाणे-भिवंडी-कल्याण या दोन्ही मेट्रो रेल्वे मार्गाचे काम भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्यावर सुरु आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे.
या वाहतूक कोंडीतून दिलासा द्यायचा असल्यास पलावा जंक्शन पूलाचे काम मार्गी लागले पाहिजे. मनसे आमदार पाटील यांनी आज पुलाच्या कामाची पाहणी केली. त्याठिकाणी केवळ चार मजूर कार्यरत असल्याने पूलाचे काम मार्गी कसे लागेल ही बाब त्यांनी एमएसआरडीसीचे सहसंचालक जिंदाल यांच्या निदर्शनास आणून दिली. त्याचबरोबर पलावा जंक्शन येथे पूलाच्या आधार खांबाच्या कामाच्या आड एक बेकायदा बांधकाम येत आहे. ते बांधकाम हटविले जात नसल्याचा मुद्दाही आमदार पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.