डोंबिवली: छत्रपती शिवाजी महाराजांनी अवलंबलेल्या कोणत्या राजधर्माचे पालन आजचे राज्यकर्ते करत आहेत असा सवाल विद्यानिकेतन शाळेचे संस्थापक विवेक पंडित यांनी केला आहे. त्यासंदर्भात स्कूल बसच्या पाठीमागे बॅनर लावून त्यांनी सवाल।केला आहे. प्रजा जाणती असेल तर जाणता राजा मिळेल असा टोला त्यांनी लगावला आहे. पंडित यांनी या बॅनरबाजीतून सध्याच्या राजकीय घडामोडीबद्दल सपशेल नाराजी व्यक्त केली आहे. कोणीही नेता शिवरायांच्या राज धर्माचे पालन करत नाही, त्यांना त्याचे शल्य देखिल नाही ही लोकशाहीची शोकांतिका असल्याचे ते म्हणाले.
शिवाजी महाराजांच्या निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू... श्रीमंत योगी...जाणता राजा या सर्व वाक्यांचा अर्थ समजून घेऊन त्यानुसार एक तरी गुण, विचार अमलात आणावा अशी अपेक्षा पंडित यांनी व्यक्त केली. सध्याच्या गोळीबारी, गुंडगिरी या सर्व राजकिय गोंधळाबाबत पंडित यांनी नाराजी व्यक्त करत बोलणे टाळले. परंतु मार्मिक टोला लगावण्याचे कार्य मात्र त्यांनी बॅनर लावून केले. हजारो विद्यार्थी, नागरिक, पालक यांच्यामध्ये त्या बॅनरबाजीची चर्चा असून सडेतोड विचारांबद्दल कौतुक देखील होत आहे.